विटा : सांगली जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सुंदर गाव पुरस्कार योजनेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल शिरगाव (ता. कडेगाव) ग्रामपंचायतीला आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिरगाव ग्रामपंचायतीने स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण आणि पारदर्शता व तंत्रज्ञान या निकषान्वये तालुकास्तरावर उत्कृष्ट कामकाज केले आहे. सरपंच विश्वास गायगवाळे, उपसरपंच भीमराव तोडकर, ग्रामसेवक प्रशांत कोळी यांच्यासह सदस्य वसंत यादव, उत्तम देशमुख, सूरज माने, हणमंत बोडरे, राजश्री देवकर, रेश्मा कांबळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
चौकट
शिरगाव ग्रामपंचायतीने खिंडारमुक्त अभियान, कचऱ्यापासून गांडूळ खतनिर्मिती, सांडपाण्यावर फळबाग लागवड आदी प्रकल्प राबविले आहेत. सर्व कचरा एकत्र जमा करून त्यापासून गांडूळखत निर्मिती केल्याने ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडली आहे. गावातील महिला बचत गटाने तयार केलेल्या विविध वस्तू गावातच दुकाने लावून विकल्या जात आहेत. त्यामुळे महिला सक्षमीकरणाला चालना मिळाल्याचे ग्रामसेवक प्रशांत कोळी यांनी सांगितले.