संजयनगर : लॉकडाऊनच्या काळात कचरावेचक महिलांचे अतोनात हाल झाले. त्यांचे आर्थिक उत्पन्न थांबले होते. अद्यापही त्यांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. यामुळे लॉकडाऊन काळातील त्यांची वीजबिले माफ करावीत, अशी मागणी अवनि संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत महावितरण विभागाला निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अवनी संस्थेकडून कचरा वेचणाऱ्या महिलांच्या विकासाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा व्यवसाय बुडाला आहे. त्यांची परिस्थिती बेताची झाली आहे. लॉकडाऊन काळातील वीजबिले अधिक आल्यामुळे ते वीजबिल त्या भरू शकत नाहीत.
महावितरणकडून वीजबिल भरण्याचा तगादा लावला जात आहे. यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तरी लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ व्हावीत, अशी मागणी निवेदनत केली आहे.
यावेळी अवनि संस्थेच्या उपाध्यक्षा अनुराधा भोसले, स्मिता गायकवाड, वैजंता गोसावी, सुनीता वाघमारे, व्दारका कांबळे, जैनुद्दीन पन्हाळकर, सोनाली कांबळे आदी उपस्थित होते.