महादेववाडी (ता. वाळवा) : येथे तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनात बोलताना दि. बा. पाटील. शेजारी उद्घाटक नागेश पाटील, जगन्नाथ माळी, अजिंक्य कुंभार आदी.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : प्रबोधन, परिवर्तन हा साहित्याचा आत्मा असला पाहिजे, तरच ते साहित्य सकस मानता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांनी केले. नव्यांनी परखड लिहावे, बदलावर भाष्य करावे. लेखकांनी केवळ प्रश्न न मांडता प्रश्नांची उत्तरे शोधावीत, असे आवाहन त्यांनी केले.
महादेववाडी (ता. वाळवा) येथे तिसऱ्या तिळगंगा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी नागेश पाटील यांच्याहस्ते उद्घाटन झाले. सभापती जगन्नाथ माळी, सहायक गटविकास अधिकारी अजिंक्य कुंभार, डी. जी. खोत, सरपंच सविता गिरीगोसावी, स्वागताध्यक्ष एच. एस. गिरीगोसावी प्रमुख उपस्थित होते.
अजिंक्य कुंभार म्हणाले, वाचणारी माणसे चांगले जगतात. तिळगंगा संमेलन भविष्यात मोठे होईल. चांगले लिखाण दर्जेदार वाचनातून येते. लेखन आनंद देते. उत्तम सावंत यांनी पुस्तकांचा परिचय सांगितला. गिरीगोसावी, एन. आर. मोहिते, राजाराम यादव यांची भाषणे झाली. मेहबूब जमादार यांनी स्वागत केले. आनंद हरी, वैशाली कोळी यांनी सूत्रसंचालन केले. जगन्नाथ माळी यांनी आभार मानले.
दुपार सत्रात कवींनी सादर केलेल्या कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. दीपक स्वामी, राहुल गौर यांच्या कवितांना उत्तम दाद मिळाली. सुनील नायकल यांनी सूत्रसंचालन केले. आर. एन. मोहिते, बी. डी. खोत, दिलीप गिरीगोसावी, राजाराम यादव, आनंद हरी, पंडित लोहार, उत्तम गुरव यांनी संयोजन केले.