आटपाडी : आटपाडी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. गावात कचऱ्याचे ढीग साठले आहेत. या आंदोलनामुळे गावाला वेठीस धरू नये, असे आवाहन सरपंच वृषाली पाटील यांनी केले आहे. दरम्यान, आंदोलनात सहभागी कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे.
पगारवाढीच्या मागणीसाठी ग्रामपंचायतीचे ४५ कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. त्यामुळे आधीच चार ते पाच दिवसांतून एकदा मिळणारे पाणी आता बंदच झाले आहे. याआधीही गेल्या दिवाळीत कर्मचारी संपावर गेले होते. आटपाडी ग्रामपंचायतीत आकृतीबंधाबाहेरील कर्मचाऱ्यांना यापूर्वी दरवर्षाला ५०० रुपये पगारवाढ होत होती. जुलै २०१८पासूनच्या कार्यकाळात फेब्रुवारी २०१९च्या पगारात ५२५ रुपयांची वाढ केली, त्यानंतर ऑक्टोबर २०१९, जुलै २०२० व आता जून २०२१मध्ये प्रत्येकी ५०० रुपये वाढ अशा तीन वर्षांमध्ये चारवेळा पगारात वाढ केली, म्हणजेच एका कर्मचाऱ्याला २०२५ रुपये पगारवाढ करुनही पगारवाढ केलीच नाही, असे म्हणून कर्मचाऱ्यांनी सोमवार, दि. ५ जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारुन गावचा पाणी पुरवठा बंद केला आहे.
दिवसाला कमीतकमी ५०० ते ७०० रुपये मिळालेच पाहिजेत, या मागणीवर कर्मचारी ठाम असल्याने कर्मचारी आणि ग्रामपंचायतीचे कारभारी यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या ३५ टक्केपेक्षा जास्त खर्च पगारावर व प्रशासन खर्चावर करता येत नाही, तरीही सध्या पन्नास टक्के खर्च होत आहे. यापेक्षा जादा पगारवाढ करता येत नाही, असे समजावून सांगूनदेखील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे.
गुरुवारी आकृतीबंधामधील पाच कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. हंगामी कामगारांची नेमणूक करून गावचा पाणी पुरवठा उद्यापासून सुरू होईल, असे सरपंच पाटील यांनी सांगितले.
चौकट
आटपाडीबाहेरचे कामगार नेमणार
हे काम बंद आंदोलन करणाऱ्या कामगारांना सध्या कोरोनामुळे आपत्तीच्या काळात आंदोलन करता येणार नाही. कामावर हजर व्हा अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. याशिवाय म्हसवड, सोलापूर आणि कोरेगाव येथील खासगी कंपन्यांकडून कर्मचारी नियुक्त करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती सरपंच पाटील यांनी दिली.