लोकमत न्यूज नेटवर्क
आटपाडी : आटपाडीच्या नूतन तहसीलदार बाई माने यांनी आटपाडीचा पदभार घेताच वाळू तस्करीवर ‘दबंग’ कारवाईला सुरवात केली. मात्र मध्यरात्री धाड टाकलेला ट्रकच गायब करत तहसीलदारांच्या पहिल्याच कारवाईला खो ? घालण्यात आला आहे. तहसील कार्यालयाच्या आवारातील जुनी वाहने जैसे थे आहेत मात्र नूतन तहसीलदारांनी पकडलेला वाळू वाहतुकीचा पहिलाच ट्रक गायब झाल्याने उलट सुलट चर्चांना उत आला आहे.
तहसीलदार बाई माने यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी ‘लोकमत’ने ‘आटपाडीच्या तहसीलदाराच्या पुढे वाळू तस्करीचे मोठे आव्हान’ अशी बातमी प्रसिध्द केली होती. याची दखल घेत माने यांनी वाळू तस्करीवर कारवाईची मोहीम राबवली. यात दि. २८ ऑगस्ट रोजी पहाटे करगणी येथील एक वाळू वाहतूक करणारा ट्रक सापडला होता. हा ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात चाकांमधील हवा काढुन उभा करण्यात आला होता. मात्र हा ट्रक दि. २९ ऑगस्टच्या मध्यरात्री गायब झाला आहे.
विशेष म्हणजे ट्रकच्या चाकात हवा भरुन तहसील कार्यालयाच्या आवारातुन तो गायब करण्यात आला आहे. या ठिकाणापाहुन हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे. तरीही असे कृत्य करण्याचे धाडस कोणी केले? याबाबत आता चर्चा रंगली आहे. याबाबत तहसील प्रशासनाने आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.