लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. यासाठी सत्ताधारी गटाबरोबर विरोधी गटानेही तयारी सुरू केली आहे. मात्र, नोव्हेंबरअखेर होणारी निवडणूक कोरोना संकटामुळे वेळेवर होणार की, पुढे जाणार याची पालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आष्टा नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या गटासह लोकनेते राजारामबापू पाटील व जलसंपदा मंत्री जयंत पाटील गटाच्या कार्यकर्त्यांना पालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. १९९६पूर्वी विलासराव शिंदे व जलसंपदामंत्री जयंत पाटील गटातील संघर्षामुळे अटीतटीच्या निवडणुका होत होत्या. मात्र, १९९६ नंतर बेरजेच्या राजकारणामुळे शिंदे-पाटील गट एकत्र आले. त्यांनी पालिकेत एकहाती सत्ता मिळवली. २०१६च्या पालिका निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी आष्टा शहर विकास आघाडीच्या स्नेहा माळी या निवडून आल्या. त्यांना विरोधी आघाडीच्या लता पडळकर यांनी जोरदार टक्कर दिली.
सत्ताधारी गटाला १३ जागा मिळाल्या. तीन अपक्ष निवडून आले, तर विरोधी लोकशाही आघाडीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. आता निवडणुकीला केवळ चार महिने शिल्लक आहेत. यामुळे त्यापूर्वी आष्टा शहरातील नवीन मतदार नोंदणी तसेच नवीन प्रभाग रचना होणे गरजेचे होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे ना मतदार नोंदणी झाली, ना नवीन प्रभाग रचना झाली. त्यामुळे पालिका निवडणुका पुढे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चौकट:
सत्ताधाऱ्यांची तारेवरची कसरत
माजी आमदार विलासराव शिंदे यांना आष्टा शहरातील गल्ली-बोळ तसेच मतदारांचा अभ्यास होता. त्यांच्या निधनानंतर होणाऱ्या या पहिल्या निवडणुकीत प्रभाग रचनेनुसार रणनीती आखताना सत्ताधारी गटाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.