सांगली : चोरीचा मोबाईल कमी किमतीत विकत घेऊन वापरणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. राजू तम्मा शिंदे (वय ३२, रा. मदभावी ता. अथणी) असे तरुणाचे नाव असून त्याच्याकडून २५ हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
४ मे २०१९ रोजी रात्रीच्या सुमारास सतीश संजय खोबरे यास बोलवाडजवळ चाकूचा धाक दाखवून अडवत त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम काढून घेण्यात आली होती. दरम्यान, संशयित राजू शिंदे याने स्वस्तात मोबाईल विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने टाकळी-बोलवाड रस्त्यावर एक अनोळखी व्यक्ती स्वस्त दरात मोबाईल विकत होता त्याच्याकडून मोबाईल घेतल्याचे सांगितले. त्याच्याकडून मोबाईल जप्त करत शिंदे याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.