कुपवाड : कुपवाड शहरासह उपनगरांतील सर्व दुकाने सोमवारपासून उघडण्याचा निर्णय रविवारी व्यापारी संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी सर्व दुकाने उघडण्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित दुकानदारांना दुकाने बंद करण्याविषयीचे आवाहन केले. आवाहनानंतर काहींनी दुकाने सुरू ठेवल्याने व्यापारी व महापालिका अधिकारी यांच्यामध्ये वादावादी झाली. या प्रकारानंतर काही वेळ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून नंतर पुन्हा सुरू केली.
कोरोनाचे नियम पाळून, प्रशासनाला सहकार्य करून शहरातील सर्व दुकाने सुरू करण्याचा निर्णय व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला होता. तसेच शहर व्यापारी संघटनेच्या वतीने मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्याबाबत निवेदन देण्याचे ठरले होते. त्यानुसार सकाळी सर्व दुकाने उघडण्यात आली. मात्र, महापालिका प्रशासनाने संबंधित दुकानदारांना दुकाने बंद करा, असे आवाहन केले.
काही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवल्याने महापालिका अधिकारी व व्यापारी यांच्यात वादावादी झाली. यानंतर काही वेळ व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली, नंतर पुन्हा सुरू केली. दरम्यान, कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी मिरजेचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी बोलताना प्रांताधिकारी म्हणाले, आपल्या निवेदनाबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
चौकट :
कुटुंबाला जगवण्यासाठी दुकाने सुरू करणार
गेल्या नव्वद दिवसांपासून कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून शासनाच्या निर्बंधांनुसार काही ठरावीक व्यावसायिक आस्थापना व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तरी देखील कोरोना रुग्णसंख्येत फारशी घट होताना दिसत नाही. व्यापाऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांना स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला जगवण्यासाठी आपली दुकाने सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, असे माहिती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अमर दिडवळ यांनी दिली.