लोकमत न्यूज नेटवर्क
कासेगाव : वाळवा-शिराळा तालुक्यांत खासगी सावकारांनी थैमान घातले आहे. कोरोनाचा व लॉकडाऊनचा फायदा घेत त्यांनी गोरगरीब, गरजू लोकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू केली आहे. दिलेल्या रकमेवर भरमसाट व्याज आकारून हे खासगी सावकार तिप्पट, चौपट रक्कम वसूल करू लागले आहेत. या सावकारांच्या त्रासाने काहींनी आपले आयुष्य संपवले आहे; तर अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची उदाहरणे आहेत. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी या प्रश्नी लक्ष घालून या खासगी सावकारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
गेले वर्षभर कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतमजूर, रोजंदार, आदींच्या हातांना काम मिळत नसल्याने पोटाची खळगी कशी भरायची? या विवंचनेत हा वर्ग आहे. याचाच गैरफायदा घेत वाळवा-शिराळा तालुक्यांत खासगी सावकारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दिलेल्या रकमेवर भरमसाट व्याज आकारून ते मुद्दल रकमेच्या तिप्पट, चौपट, पाचपट रक्कम वसूल करू लागले आहेत. दोन्ही तालुक्यांतील काही मोठ्या गावांत या सावकारांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. व्याजापोटी काहींनी आपल्या जमिनी, घरे, सोने, आदी या सावकारांच्या घशात घातल्या आहेत. भीतीपोटी त्यांच्याविरोधात कोणी तक्रारी करीत नाहीत, असे वास्तव आहे.
चौकट
नागरिक त्रस्त
काही गावांत या खासगी सावकारांनी पैसे वसूल करण्यासाठी गावगुंड नेमले आहेत. ते गुंड साम, दाम, दंड, भेद, आदी अस्त्रांचा वापर करून वसुली जोरात करीत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत.