अशोक पाटील - इस्लामपूर -यशवंतराव मोहिते कृष्णा सह. साखर कारखान्याच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. तीनही गटांनी निवडणूक जाहीर होण्याअगोदरच प्रचारात गती घेतली आहे. रयत पॅनेलच्या संपर्क दौऱ्यात डॉ. इंद्रजित मोहिते यांच्याबरोबर यशवंतराव मोहिते यांच्याबरोबरीने काम करणारे ज्येष्ठ नेते दिसत आहेत. या नेत्यांना आगामी निवडणुकीत अर्धचंद्र द्यावा, अशी मागणी तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते करताना दिसत आहेत. येडेमच्छिंद्र येथील सभेत सभामंडपी बसलेल्या ज्येष्ठ मंडळींचा पत्ता कट करावा, असे मेसेजही इंद्रजित मोहिते यांच्या भ्रमणध्वनीवर करण्यात आले होते.कृष्णा कारखान्याची निवडणूक ही एकूण ६ गटात होत असून, यामध्ये वडगाव हवेली-दुशेरे, काले-कार्वे, नेर्ले-तांबवे, रेठरेहरणाक्ष-बोरगाव, येडेमच्छिंद्र- वांगी, रेठरेबुद्रुक-शेणोली या गटांचा समावेश आहे. या गटामध्ये वाळवा, कऱ्हाड, कडेगाव तालुक्यातील गावांचा समावेश आहे.डॉ. इंद्रजित मोहिते यांनी गेल्या वर्षापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रारंभीच्या काळात त्यांचेच बंधू मदनराव मोहिते यांच्याबरोबर नव्हते. परंतु निवडणुकीचे बिगुल वाजताच काँग्रेसच्या काही ज्येष्ठांनी या दोघांचे मनोमीलन घडवून आणले. परंतु कार्यकर्त्यांच्यात मात्र अजूनही दरी निर्माण झाली आहे.इंद्रजित मोहिते यांच्या संपर्क दौऱ्यावेळी हणमंतराव शिरटेकर (शिरटे), सर्जेराव पाटील (कामेरी), आनंदराव मलगुंडे (इस्लामपूर), अजित थोरात (बहे), बाळनाना पाटील (बोरगाव), संपतराव थोरात (कार्वे), संपतराव सावंत (नरसिंहपूर) आदी ज्येष्ठ नेत्यांचा नेहमीच वावर दिसतो. या चेहऱ्यांना आता सभासद कंटाळले असून, तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळावी, अशी मागणी इंद्रजित मोहिते यांच्याकडे केली जात आहे.मदनरावांच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेची चर्चामदनराव मोहिते यांनी स्वतंत्र पॅनेल करावे म्हणून त्यांच्या समर्थकांनी आग्रह धरला होता. इंद्रजित मोहिते यांच्या कार्यकर्त्यांनीही मदनराव मोहिते यांना सोबत न घेताच स्वतंत्र पॅनेल उभे करावे, अशी मागणी केली होती. परंतु काँग्रेस नेत्यांनी या दोघांना एकत्र आणून एकाच पॅनेलखाली लढण्याचा सल्ला दिला आहे. मदनराव मोहिते ज्येष्ठ असून, त्यांनी आता निवडणुकीच्या रणांगणात न उतरता केवळ मार्गदर्शकाची भूमिका बजावावी, अशी चर्चाही रयत पॅनेलच्या कार्यकर्त्यांतून आहे.सभासदांच्या घरात तिसऱ्या फळीतील उच्चशिक्षित कार्यकर्त्यांची मोठी संख्या आहे. युवा पिढीने ज्येष्ठांना फक्त मार्गदर्शक म्हणून प्रचार सभेत सामावून घ्यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत आपण मदनराव मोहिते यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. युवकांना संधी देण्यासाठी आपण आग्रही राहू.- डॉ. इंद्रजित मोहिते, माजी अध्यक्ष, य. मो. कृष्णा सह. साखर कारखाना.
रयत पॅनेलमधून ज्येष्ठांना मिळणार अर्धचंद्र
By admin | Updated: April 10, 2015 00:37 IST