लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : येथील राजारामबापू सहकारी बॅँकेमध्ये रिझर्व्ह बॅँकेच्या निर्देशानुसार बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती बॅँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांनी दिली. या नियुक्त बोर्डाकडून बॅँकेला व्यवसाय वृद्धी, संगणकीकरण यासह विविध क्षेत्रांतील प्रगतीच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाटील म्हणाले, या बोर्डमध्ये उद्योजक बाबूराव हुबाले, चार्टर्ड अकौंटंट सुनील वैद्य, उमाकांत कापसे, आयटी तज्ज्ञ डॉ. सचिन पाटील, बॅँक अधिकारी शिवाजीराव कुंभार, संदीप गोखले यांचा समावेश आहे. बँकांचे व्यवस्थापन व्यावसायिक पद्धतीने आणि पारदर्शी होण्यासाठी मालेगम व आर. गांधी समितीने केलेल्या शिफारशीनुसार सहकारी बॅँकांमध्ये तज्ज्ञांचे व्यवस्थापन मंडळ नियुक्त करण्याचे निर्देश रिझर्व्ह बॅँकेने दिले आहेत.
ते म्हणाले, संचालक मंडळाशिवाय या बोर्ड ऑफ मॅनेजमेंटची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील या तज्ज्ञ मान्यवरांकडून बॅँकेची विविध धोरणे, कर्ज, गुंतवणूक, वसुली, एकरकमी कर्ज परतफेड योजना, संगणकीकरण ऑडिट आणि तपासणी यासंदर्भात संचालक मंडळाला सल्ला दिला जाणार आहे. यावेळी बॅँकेचे उपाध्यक्ष जनार्दन पाटील, कार्यकारी संचालक आर. एस. जाखले उपस्थित होते.