सांगली : नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल सायन्सेसतर्फे ‘नीट पीजी २०२५’ ही वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा १५ जून २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ७ मे २०२५ पर्यंत अर्ज करता येईल.प्रक्रियेअंतर्गत अर्जामधील त्रुटी ९ मे ते १३ मे या कालावधीत दुरूस्त करता येणार आहेत.त्याचप्रमाणे फोटो, स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा चुकीच्या पद्धतीने अपलोड केला असेल तर २४ ते २६ मेपर्यंत त्यामध्ये दुरुस्ती करता येईल. विद्यार्थ्यांना २ जूनला परीक्षेसाठी मिळालेले शहर समजेल. ११ जूनला विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. परीक्षेचा निकाल १५ जुलैपर्यंत घोषित केला जाण्याची शक्यता आहे.नीट पीजीसाठी देशभरात १७९ केंद्र असून त्यापैकी महाराष्ट्रात १५ केंद्रे आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या एम.डी., एम.एस., डी.एन.बी. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश या परीक्षेद्वारे होतात. देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारी महाविद्यालयातील ५० टक्के जागा या अखिल भारतीय कोट्यातून मेडिकल कौन्सलिंग कमिटीमार्फत भरल्या जातात तर सरकारी कोट्यातील ५० टक्के जागा आणि खासगी कोट्यातील १०० टक्के जागा या संबंधित राज्याच्या कौन्सलिंग कमिटीद्वारे भरल्या जातात. ही परीक्षा दोन सत्रांत घेण्यात येणार आहे. ३१ जुलै २०२५ पर्यंत अंतरवासीयता अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी नीट पीजी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत.
‘नीट पीजी’ची परीक्षा गेल्यावर्षी देखील दोन सत्रांत घेण्यात आली होती मात्र एका सत्रात सोपा तर दुसऱ्या सत्रात अवघड पेपर आल्याने तसेच परीक्षेत पारदर्शकतेचा अभाव असल्याने सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया देखील खूप उशिरा सुरू झाली होती. यावर्षी यामध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली