इस्लामपूर : इस्लामपूर शहरात स्वाईन फ्लूचा संसर्ग सुरू झाल्यानंतर आज, सोमवारी तिसऱ्या दिवशी शास्त्रीनगरातील ३0 वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. स्वाईन फ्लूने एका महिलेच्या झालेल्या मृत्यूनंतर आणखी एक रुग्ण सापडल्याने स्वाईन फ्लू बळावत असल्याचे स्पष्ट होत आहे. कबनूर (ता. हातकणंगले) येथील विमल पाटील या महिलेच्या मृत्यूनंतर शहरात स्वाईन फ्लूची लागण सुरू झाली आहे. २३ आॅगस्टपासून येथील उपजिल्हा रुग्णालयात तीन संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. त्यामध्ये दीपाली प्रदीप चव्हाण (वय ३0, रा. शास्त्रीनगर), लीलाबाई आनंदराव दिघे (६0, रा. होळकर डेअरीजवळ, इस्लामपूर), रेश्मा खाटीक यांचा समावेश आहे.या तिन्ही रुग्णांच्या घशातील द्रवपदार्थांचे नमुने पुण्याच्या शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातील दीपाली चव्हाण या महिलेला स्वाईन फ्लूची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे अधिष्ठाता डॉ. श्रीकांत भोई यांनी सांगितले. लीलाबाई दिघे यांचा अहवाल नकारात्मक असून, रेश्मा खाटीक यांचा अहवाल उद्या, मंगळवारी प्राप्त होणार आहे.आज दीपाली चव्हाण यांचा अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्यासह इतर रुग्णांचीही परिस्थिती सामान्य आहे. या रुग्णांच्या कुटुंबीयांसह त्या त्या परिसरात सर्वेक्षण करण्यात आले असून, स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळला नसल्याचे डॉ. भोई यांनी स्पष्ट केले. शहरातील इतर खासगी रुग्णालयातही संपर्क ठेवण्यात आला असून, संशयित रुग्ण सापडल्यास त्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला देण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
इस्लामपुरात स्वाईन फ्लूचा आणखी एक रुग्ण
By admin | Updated: August 25, 2014 23:36 IST