विटा : पावणे दोन वर्षांपूर्वी उपचारासाठी गुजरातच्या जामनगर येथील वनतारात पाठविलेल्या विटा येथील गणेश हत्तीबाबत नागरिकांना कोणतीही माहिती न मिळाल्याने विटा येथील प्राणीमित्र विवेक भिंगारदेवे यांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. गुजरातच्या वनतारा व भैरवनाथ यात्रा कमिटीने गणेश हत्तीची नागरिकांना तातडीने माहिती द्यावी, अशी प्रमुख मागणी यावेळी प्राणीमित्र भिंगादेवे यांनी प्रशासनाकडे केली आहे.विटा येथील भैरवनाथ यात्रा कमिटीचा गणेश हत्ती मणक्याचा विकार व शरीरावर जखमा झाल्याने उपचारासाठी दि. ३ नोव्हेंबर २०२३ला जामनगरच्या वनतारा येथे पाठविला. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून वनताराने गणेश हत्तीच्या प्रकृतीबाबत कोणतीही माहिती दिली नाही. भैरवनाथ यात्रा कमिटीनेही याबाबत फारसा पाठपुरावा केला नसल्याचा आरोप विवेक भिंगारदेवे यांनी केला आहे. त्यामुळे विट्याच्या लाडक्या गणेश हत्तीची वनताराने माहिती द्यावी. तसेच यात्रा कमिटीनेही गणेशच्या प्रकृती आणि सध्या त्याच्या अस्तित्त्वाबाबत खुलासा करावा, अशी मागणी विवेक भिंगारदेवे यांनी केली आहे. या मागणीसाठी प्राणीमित्र भिंगारदेवे यांनी सोमवारी सकाळपासून विटा तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शेकापचे ॲड. सुभाष पाटील, ॲड. सुभाष पवार, माजी नगरसेवक कृष्णत गायकवाड, अमर शितोळे यांच्यासह नागरिकांना पाठिंबा दिला आहे.
Sangli: विट्यात गणेश हत्तीसाठी प्राणीमित्राचे धरणे आंदोलन; पावणे दोन वर्षांपूर्वी उपचारासाठी वनतारात पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 17:58 IST