इस्लामपूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील सहा टीएमसी पाणी इंदापूरला देण्याचा शासन आदेश तातडीने रद्द न केल्यास २७ मे रोजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखाना कार्यस्थळावरील निवासस्थानासमोर शंखध्वनी आंदोलन करण्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव समितीचे नेते अतुल खुपसे-पाटील यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी येथील तहसीलदार कार्यालयास दिले आहे. २२ एप्रिल रोजी उजनीचे पाणी इंदापूरला वळविण्याचा निर्णय झाला होता. त्याला आम्ही तीव्र विरोध केल्यानंतर जलसंपदा मंत्री पाटील यांनी या निर्णयाला स्थगिती दिल्याचे माध्यमांना सांगितले होते. मात्र तीन दिवस झाले तरी हा निर्णय रद्द करणारा अध्यादेश निघालेला नाही. हा निर्णय रद्द झाला नाही तर आम्ही उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते २७ रोजी आंदोलन करणार असल्याचे त्यात म्हटले आहे.