इस्लामपूर : इस्लामपुरात प्रजासत्ताकदिनी झालेल्या नृत्याविष्कार महासंग्रामात शहरातील विद्यार्थ्यांनी धूम केली. जवळपास पाच तास हा आनंद सोहळा रंगला. या नृत्याविष्कारात प्राथमिकमधून आदर्श इंग्लिश मिडीयम, तर माध्यमिक गटातून राजारामबापू मिलिटरी स्कूल विजेते ठरले.‘लोकमत’ बाल विकास मंचतर्फे ‘नृत्याविष्कार २०१५’ या नृत्य, कला, संस्कृतीच्या महासंग्रामाचे आयोजन इस्लामपूर मेडिकल असोसिएशन व मऱ्हाठमोळा युवक मंडळाच्या सहकार्याने येथील राजारामबापू नाट्यगृहात करण्यात आले होते. ‘लोकमत’चे संस्थापक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रध्देय जवाहरलालजी दर्डा (बाबूजी) यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. सतीश गोसावी, डॉ. पी. टी. शहा यांच्याहस्ते झाल्यानंतर समूहनृत्य स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी डॉ. अतुल मोरे, डॉ. राहुल मोरे, डॉ. प्रकाश कुलकर्णी, डॉ. मुजफ्फर मुल्ला, डॉ. श्रीगणेश पवार, ‘मऱ्हाठमोळा’चे सुरेंद्र पाटील, राकेश पाटील उपस्थित होते. डॉ. मुल्ला यांनी यापुढेही मेडिकल असोसिएशनचे सहकार्य देण्याची ग्वाही दिली.सद्गुरु आश्रमशाळेच्या चमूने ईशस्तवन आणि गण सादर केल्यानंतर मुख्य स्पर्धेला सुरुवात झाली. प्राथमिक गटातील स्पर्धेत डॉ. व्ही. एस. नेर्लेकर विद्यालयाच्या शिशुविहारमधील चिमुकल्यांनी ‘माऊली माऊली’चा गजर करीत अवघे पंढरपूर व्यासपीठावर अवतरले. त्यानंतर ‘रिध्दी-सिध्दी, नाचरे मोरा, धनगराची लेक, ललाटी भंडार’ या गाण्यांवर चिमुकल्यांनी ताल धरला. आपल्या पाल्यांच्या अदाकारीला पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मध्यंतराला रचना पाटीलने कॉकटेल नृत्य सादर केले.दुसऱ्या सत्रात माध्यमिक गटातील स्पर्धांना सुरुवात झालीे. इंडिया रे, फ्युजन, कॉकटेल, हिंदी रिमिक्सच्या तडक्यात ‘बाप्पा मोरया, रंगीलो मारो डोलना, आई अंबा भवानी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हुप्पा-हुय्या, बासरी नृत्य, इतनीसी हसी’ यासह राजस्थानी नृत्यप्रकाराची मेजवानी रसिकांना मिळाली.कोल्हापूरच्या नृत्यविशारद शुभांगी तेवरे, दीपक बीडकर व विजय नांगरे यांनी परीक्षण केले. विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलच्या अध्यापिका सौ. योजना पाटील यांनी सूत्रसंचालन केले.पं. स. सदस्य प्रकाश पाटील यांनी कार्यक्रमास सदिच्छा भेट दिली. मनोज पवार, एस. ए. थोरात, कौसल्या सूर्यवंशी, दीपाली नावडकर, बीना शहा, नंदा हुलके यांनी संयोजन केले. सखी, बाल मंच संयोजिकांनी आभार मानले. (वार्ताहर)
नृत्याविष्कारात ‘आदर्श’,‘राजारामबापू’ची बाजी
By admin | Updated: January 29, 2015 00:06 IST