दत्ता पाटीलतासगाव : माजी खासदार संजय पाटील विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय प्लॅटफॉर्मपासून दुरावले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संजय पाटील यांची अनेक दिवसांपासून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका आहे. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. निवडणुका तोंडावर आल्यामुळे पाटील यांना भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. संजय पाटील दसऱ्याला सीमोल्लंघन करून रणांगणात उतरतील, अशी शक्यता आहे. त्यानंतरच संजय पाटील गटाच्या राजकीय प्रवासाचे चित्र स्पष्ट होईल.
सांगली जिल्ह्यात लोकसभेला सलग दोनवेळा भाजपचे कमळ फुलविणाऱ्या संजय पाटील यांना हॅटट्रिक करता आली नाही. लोकसभेच्या पराभवानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर तासगाव कवठेमहांकाळची विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत देखील पराभव पत्करावा लागल्यानंतर संजय पाटील राजकीय व्यासपीठापासून दूर राहू लागले.
मागील सहा महिन्यांत त्यांनी राष्ट्रवादीचे व्यासपीठ सोडून दिले पण, भाजपच्याही व्यासपीठावर दिसले नाहीत. त्यांची राजकीय भूमिका संदिग्ध राहिल्यामुळे कार्यकर्त्यांच्या देखील संभ्रमावस्था निर्माण झाली. मात्र, त्यांनी राजकीय पक्ष बाजूला ठेवला असला तरी कार्यकर्त्यांशी कामाच्या बाबतीतली बांधिलकी कायम ठेवले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यामुळे संजय पाटील यांनी राजकीय भूमिका लवकर स्पष्ट करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. संजय पाटील घेतील तो निर्णय मान्य करून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी संजय पाटील समर्थक सज्ज झाले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर संजय पाटील लवकरच राजकीय सीमोल्लंघन करून मैदानात उतरतील, अशी शक्यता आहे.
सोशल मिडियावर चर्चासंजय पाटील यांच्या व भाजपच्या भूमिकेविषयी कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर मते मांडली गेली आहे. माजी खासदार संजय पाटील यांच्याशिवाय भाजप अपूर्ण व भाजपलाच त्यांची पसंती आहे, अशी भावना कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर व्यक्त होत आहे.संजय पाटील गटाच्या कारभाऱ्यांना भाजपचा गळसंजय पाटील यांची राजकीय भूमिका अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान, संभ्रमावस्थेत असलेल्या त्यांच्या गटाच्या अनेक कारभाऱ्यांना भाजपच्या नेत्यांनी गळ टाकला आहे. या गळाला काही कारभारी लागले असून त्यांना पक्षाच्या कार्यकारिणीत सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे काकांपासून दुरावलेल्या या कार्यकर्त्यांच्या बाबतीत आगामी राजकीय भूमिका काय असेल, हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे.