वारणावती : चांदोली राष्ट्रीय उद्यानालगतच्या परिसरात रानगव्याची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली असून शेतकऱ्यांचे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. काल शिराळे–वारुण येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याची घटना ताजी असतानाच, अवघ्या बारा तासांत आज पुन्हा रानगव्याने शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. मणदूर (पारदीचा माळ) येथे ऊसतोड करत असलेल्या दोन शेतकऱ्यांवर उसाच्या शेतातून अचानक झेप घेत रानगव्याने हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.आज सकाळी साडेनऊच्या सुमारास लक्ष्मण तातोबा माने (वय ४५) व बंडोपंत विष्णू पाटील (वय ४०) हे शेतात ऊस तोडणी करत असताना रानगव्याने अचानक हल्ला केला. लक्ष्मण माने यांना गव्याने उचलून जोरात जमिनीवर आपटले. या हल्ल्यात त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून शरीरावर मोठ्या प्रमाणात मारहाणीच्या जखमा आहेत. बंडो पाटील यांच्या तोंडाला व शरीराला देखील दुखापत झाली आहे.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तत्काळ दोघांनाही मणदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. दवाखान्याबाहेर नातेवाईक व ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी वनविभागाच्या निष्क्रिय कार्यपद्धतीविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.काल शाहूवाडी तालुक्यातील शिराळे–वारुण येथे शिवाजी चिंचोलकर यांच्यावर रानगव्याने हल्ला करून त्यांच्या पोटाला गंभीर इजा केली होती. गव्याच्या धडकेत पोट फाटून आतडी बाहेर आल्याची धक्कादायक घटना घडली असून ते सध्या कराड येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत.
तातडीने रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीवारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरातील शेतकरी प्रचंड दहशतीत असून, वनविभागाकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “शेतात काम करायला गेलो की जीव मुठीत धरावा लागतो. रानगव्यांचा बंदोबस्त न झाल्यास शेतात जायचं तरी कसं?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. तातडीने रानगव्यांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
Web Summary : A bison attacked sugarcane workers in Sangli district, injuring two. This follows another recent attack, sparking outrage over ineffective wildlife management and demands for immediate action from forest authorities.
Web Summary : सांगली जिले में एक बाइसन ने गन्ना श्रमिकों पर हमला किया, जिसमें दो घायल हो गए। यह एक हालिया हमले के बाद हुआ है, जिससे अप्रभावी वन्यजीव प्रबंधन पर आक्रोश है और वन अधिकारियों से तत्काल कार्रवाई की मांग की गई है।