निवेदनात म्हटले आहे की, खा. पाटील यांनी पुढाकार घेऊन शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे तासगाव कोविड सेंटर सुरू केले. ते सुरू करण्यासाठी शहरातून आणि तालुक्यातून पदाचा गैरवापर करून देणगी वसूल केली. लोकवर्गणीतून संपूर्ण साहित्य आणि यंत्रसामग्री खरेदी केली. शासकीय मालकीच्या महिला तंत्रनिकेतनच्या इमारतीचा वापर केला गेला. संपूर्ण स्टाफ तासगाव नगरपालिकेचे कामकाज बंद ठेवून मोफत वापरला गेला. तरीसुद्धा जास्त पैशांची लूट रुग्णांकडून केली गेली.
खासदारांच्या नियोजनशून्य कारभारामुळे व बेजबाबदार डॉक्टरांमुळे तासगाव कोविड सेंटरचा मृत्युदर २६ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. १ जानेवारी २०२१ पासून आजअखेर २५४ रुग्ण दाखल झाले असून त्यापैकी ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये ५४३ रुग्ण दाखल झाले, त्यापैकी ४० रुग्ण मृत झाले. हे मृत्युदर प्रमाण ७.३४ टक्के आहे. डॉ. विजय जाधव यांच्या खासगी रुग्णालयात एकूण २०३ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ८ रुग्णांचा मृत्यू झाला. हे मृत्यूप्रमाण ३.९४ टक्के आहे. तासगाव कोविड सेंटर व स्वत:च्या हॉस्पिटलमध्ये डॉ. विजय जाधव हेच उपचार करत होते. डॉ. जाधव यांच्या हॉस्पिटलपेक्षा अद्ययावत सामग्री तासगाव कोविड सेंटरमध्ये होती. असे असताना त्यांच्या हॉस्पिटलमध्ये ३.९४ टक्के मृत्युदर, तर तासगाव कोविड सेंटरचा २६.३७ टक्के मृत्युदर का?
याची संपूर्ण चौकशी होऊन कोविड सेंटरचे प्रवर्तक खा. पाटील व दोषी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलने करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.