सांगली : गेल्या दीड वर्षापासून आरोग्य कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहेत. रजा, सुट्ट्या नाहीत. जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची ६६९ पदे रिक्त आहेत. यात भर म्हणून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचीही १९० पदे रद्द केल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. तरीही मंत्री आरोग्याची रिक्त पदे भरण्यासाठी गंभीर नाहीत, अशी टीका आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केला.
दत्तात्रय पाटील म्हणाले की, गेल्या दीड वर्षापासून आरोग्य कर्मचारी अहोरात्र लोकांची सेवा करीत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्येक आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. लसीकरण करण्यासाठी १२० कंत्राटी आरोग्यसेविकांची नेमणूक केली होती. डाटा ऑपरेटर ७० अशा १९० आरोग्य कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेवर कामाचा ताण वाढला आहे. जिल्ह्यात आरोग्यसेविकांची मंजूर पदे ५७९ असून, त्यापैकी २४५ कार्यरत आहेत. आरोग्यसेवकाची एकूण ४४२ पदे मंजूर असून, केवळ १०७ कर्मचारी कामावर आहेत. एवढ्या कमी कर्मचाऱ्यांवर कोरोनासारख्या महामारीचे काम करून घेतले जाते आहे. तरीही पालकमंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे कोरोनाची तिसरी लाटेचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी घोषणा करीत आहेत. या घोषणा करताना प्रत्यक्षात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा जरा शासनाने विचार करावा. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सरकारने आदी आरोग्य विभागाची रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे, अन्यथा आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होणार आहेत.
चौकट
ऑगस्ट निम्मा संपला, तरीही पगार नाही
आरोग्य कर्मचारी कशाचीही पर्वा न करता रात्रंदिवस काम करतो आहे. प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करून, गेल्या दोन वर्षांत कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार होत नाही. ऑगस्ट महिना संपत आला, तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यांचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो, असा इशाराही पाटील यांनी दिला आहे.