सांगली : कवलापूर (ता. मिरज) येथे बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या शेडमधून चोरट्यांनी रोख ४० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा ५८ हजारांचा मु्द्देमाल लंपास केला. याप्रकरणी उज्ज्वला गंगाराम शिंदे (रा. तासगाव रोड, कवलापूर) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी शिंदे यांचे कवलापूर येथे नवीन बांधकाम सुरू आहे. शनिवारी रात्रीच्या सुमारास त्या उघड्या घरामध्ये झोपल्या होत्या, तर शेजारीच सुरू असलेल्या एका रुग्णालयाच्या बांधकामाचे सेंट्रिंग कामगारही पत्र्याच्या शेडमध्ये झोपले असताना, चोरट्यांनी शेडमध्ये प्रवेश करून रोख ४० हजार रुपयांसह सोन्याचे वेल, रिंगा, अंगठी, तीन मोबाईल, एटीएम कार्ड, बँकेचे पासबुक असा मुद्देमाल लंपास केला. या प्रकारानंतर शिंदे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.