मिरज : वड्डी येथे ता. मिरज येथे ओढ्याजवळ निर्मनुष्य ठिकाणी पाय बांधून ठेवलेल्या ५१ डुकरे व रानडुकरांना प्राणीमित्रांनी मुक्त केले. याबाबत अज्ञात शिकार्यांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
गुरुवारी सकाळी वड्डीत ओढ्याजवळ झूडुपात ओरडणारी डुकरे पाहून शेतकर्यांनी मिरजेतील प्राणीमित्रांना याबाबत माहिती दिली. पीपल फॉर ॲनिमल्सचे अशोक लकडे, अनिमल राहतचे किरण नाईक, डॉ. दिलीप शिंगाणा, ऋषिकेश लकडे, सुधीर चौगुले, ओमकार पुजारी यांच्यासह सदस्यांनी वड्डी येथे जाऊन बांधून ठेवलेल्या डुकरांची मुक्तता केली. दोन दिवस बिना पाणी व अन्ना विना तडफडणारी ही डुकरे अर्धमेल्या अवस्थेत होती. यापैकी दहा रानडुकरे व इतर शहरी डुकरे होती. या डुकरांची मुक्तता करुन त्यांना अन्न पाणी देण्यात आले. कर्नाटकातून रात्रीच्या वेळी येणारे शिकारी शेतात जाळी लावून डुकरे पकडतात. या डुकरांना कापून मांस विक्री करण्यांत येत असल्याची माहिती मिळाली. प्राणीमित्रांनी याबाबत वन विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र अधिकारी फोन उचलत नसल्याने याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत तक्रार करण्यांत आली आहे. मुक्या प्राण्यांना निर्जनस्थळी विनाअन्न-पाण्यावाचून मरण्यासाठी टाकणाऱ्या शिकाऱ्यांचा शोध घेऊन कारवाईची मागणी पोलिसांत करण्यात आली आहे.