लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे, अशी गेली कित्येक वर्षे स्थिती असलेल्या सांगली-पेठ या रस्त्याच्या चौपदरीकरणाचा ४९० कोटींचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पडून आहे. अशातच आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या रस्त्यासाठी २२ कोटींची घोषणा केली आहे. या निधीतून आता २० किलोमीटरचे डांबरीकरण होणार आहे. एकीकडे मराठवाडा, विदर्भातील रस्त्यांसाठी दोनशे ते चारशे कोटींचा निधी मंजूर होत असताना, सांगली-पेठचा संपूर्ण प्रस्ताव मंजूर न झाल्याने नाराजी आहे.
वाहनांची गर्दी, अपघातांचे वाढते प्रमाण, खड्ड्यांचे साम्राज्य यामुळे सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेकदा पॅचवर्क केले; पण ते महिन्याभरात उखडले गेले. सांगली ते पेठपर्यंतचा रस्ता तर मृत्यूचा सापळा बनला होता. काही ठिकाणी रस्ता चौपदरीकरण, तर काही ठिकाणी तीनपदरी रस्ता आहे. पेठ ते इस्लामपूरपर्यंतचा रस्ताही अरुंद आहे. या रस्त्यावर पुणे-मुंबईकडे जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.
गत वर्षापूर्वी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर रस्त्याच्या चौपदरीकरणाची चर्चा सुरू झाली. राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही त्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू केला. अखेर केंद्र शासनाच्या रस्ते विकास मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणा केली. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा ४९० कोटींचा आराखडा तयार केला. हा आराखडा केंद्र शासनाला सादर केला आहे. पेठपासून सांगलीवाडीपर्यंत संपूर्ण रस्ता काँक्रिटचा करण्याचे नियोजन करण्यात आले. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची घोषणा होईल, अशी अपेक्षा होती. पण ती फोल ठरली. आता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातून २० किलोमीटरचे डांबरीकरण होणार आहे. पण संपूर्ण रस्त्याच्या मजबुतीकरणाचे स्वप्न मात्र हवेत विरले आहे.
चौकट
३९ कोटींचा खर्च
सांगली-पेठ हा ४६ किलोमीटरचा रस्ता आहे. नुकत्याच मंजूर झालेल्या २२ कोटींतून २० किलोमीटरचे डांबरीकरण होणार आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १७ कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्यातून १३ किलोमीटरचे काम होईल, तर सार्वजनिक बांधकाम विभागाने सात किलोमीटरचे काम पूर्ण केेले आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी हा रस्ता किमान खड्डेमुक्त होण्याची आशा पल्लवित झाली आहे.
चौकट
कोट्यवधीच्या घोषणा हवेत
या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी १२०० कोटींची घोषणा करून चार ते पाच वर्षे लोटली आहेत. दुसरीकडे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या विकास पुस्तिकेत या रस्त्यासाठी ३४५ कोटींचा निधी मंजूर करून आणल्याचे म्हटले आहे. या रस्त्याच्या निधीने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली असताना, प्रत्यक्षात मात्र हाती काहीच लागलेले नाही. लोकप्रतिनिधींच्या घोषणा पारावरच्या गप्पाच ठरल्याची प्रतिक्रिया समाजमाध्यमांतून उमटत आहेत.