लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या विळख्यासह इतर दुर्धर आजाराने वाळवा तालुक्यातील ४७० विद्यार्थ्यांच्या आई, वडिलांचे निधन झाले आहे. यातील सहा विद्यार्थ्यांच्या आई, वडिलांचे निधन झाल्याने ही मुले पूर्णत: निराधार बनली आहेत. कोविडमुळे १७७, तर इतर आजारांमुळे २९३ पालकांचे निधन झाले आहे.
कोविड व इतर आजारांमुळे पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार पंचायत समितीमधील शिक्षण विभागाने संकलित केलेल्या माहितीतून ४७० विद्यार्थ्यांनी आपले पालक गमाविल्याचे समोर आले आहे. पालकांच्या निधनामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण ते शिकत असलेल्या शासकीय अथवा खासगी शाळेत नियमित सुरू ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
वाळवा तालुक्यामध्ये एकूण ६१ जिल्हा परिषद मराठी आणि उर्दू शाळा आहेत. यातील १०७ विद्यार्थ्यांच्या पालकांचे निधन झाले आहे. खासगी अनुदानित शाळा ८७ असून त्यातील ३१५ विद्यार्थ्यांचे, तर स्वयं अर्थसाहाय्यित शाळांची संख्या २४ असून त्यातील ४८ विद्यार्थ्यांचे पालक कोविड व इतर आजारांमुळे दगावले आहेत.
६९ विद्यार्थ्यांच्या आईचा, तर ३९५ विद्यार्थ्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. ही मुले अंशत: निराधार ठरली आहेत, तर ६ विद्यार्थ्यांचे आई, वडील दगाविल्याने ही मुले पूर्णत: निराधार झाली आहेत. कोविड किंवा इतर आजारामुळे मृत्यू झालेल्या वाळवा तालुक्यातील पालकांचा एकही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेलेला नाही. ४५४ विद्यार्थी आहे त्याच शाळेत शिकत असून, १६ विद्यार्थी हे शिकत असलेल्या शाळेतून दुसऱ्या शाळेत उच्च वर्गात प्रवेशित झाले आहेत.