सांगली : राज्य जीएसटी विभागातर्फे कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार गुन्हे नोंद होत आहेत. मार्केट यार्डातील आणखी एका व्यापाऱ्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. अभिनंदन बाबासाहेब खोत (मूळ रा. बाहुबली, कुंभोज, ता. हातकणंगले, सध्या वसिष्ठ आर्केड, सांगली) असे त्यांचे नाव आहे.सन २०१६ ते २०१७ या वर्षांचा तब्बल ३५ लाख १७ हजार ६९० रुपयांचा विक्रीकर बुडवल्याचे समोर आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी राज्य कर निरीक्षक संतोष शामराव मोहिते (रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.संशयित अभिनंदन खोत यांचा मार्केट यार्डात व्यवसाय आहे. त्यांची मूल्यवर्धित कर कायद्यांतर्गत नोंदणी आहे. मात्र, अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत खोत यांनी २०१६ ते २०१७ या कालावधीत ३५ लाख १७ हजार ६९० रुपयांचा विक्रीकर बुडविल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर खोत यांच्याशी पत्रव्यवहार झाला. नोटीस देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर खोत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवारी मार्केट यार्डातील संजय ठक्कर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सांगलीत ३५ लाखांचा कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यावर गुन्हा, राज्य जीएसटी विभागाची कारवाई
By शरद जाधव | Updated: June 28, 2023 17:38 IST