लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी प्रसिद्ध
असलेल्या कडेगाव तालुक्यातील
चिंचणी येथील गायकवाडसो पीरसाहेब दर्ग्याचा कायापालट करण्यात येणार आहे. या परिसरात पेव्हिंग ब्लॉक व इतर सोयीसुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग व विकास महामंडळाच्या
सीएसआर फंडातून २० लाख रुपये व
सभामंडपासाठी आमदार मोहनराव कदम यांच्या फंडातून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
चिंचणी येथील गायकवाडसो उरूस दर्गा परिसरात दररोज राज्यभरातून भाविक येत असतात. बेलगंगा ओढ्याकाठी असलेल्या या परिसराला धार्मिक स्थळाबरोबरच पर्यटन स्थळ म्हणूनही महत्त्व आलेलं आहे. या दर्ग्याचे आणि आजूबाजूच्या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा संकल्प येथील हिंदू - मुस्लिम बांधवांनी केला आहे.
सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष
शांताराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली येथील विकास आराखड्याचे काम करण्यात आले आहे. या आराखड्यानुसार दर्ग्याच्या मुख्य रस्त्यावर आकर्षक प्रवेशद्वार उभारणे, वॉल कंपाऊंड करणे, विविध फळांची व फुलांची झाडे लावणे, प्राचीन काळाची आठवण करून देणारे बाकडे आणि लाइटची व्यवस्था करणे, भाविकांसाठी निवास व्यवस्था करणे, मुख्य रस्ता ते दर्ग्यापर्यंतच्या रस्त्याचे सुशोभीकरण करणे, असा आराखडा करण्यात आला आहे. या कामांसाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करण्यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम प्रयत्नशील आहेत.
चौकट
क वर्ग पर्यटन दर्जासाठी प्रयत्न : शांताराम कदम
चिंचणी येथील गायकवाडसो पिरसाहेब दर्गा परिसरास क पर्यटन स्थळाचा दर्जा
मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या
सूचना चिंचणी ग्रामपंचायतीस दिल्या आहेत. या परिसरास क वर्ग दर्जा
मिळाल्यास येथील विकास कामासाठी निधी मिळविणे अधिक सोपं जाणार आहे, असे सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांनी सांगितले.