सांगली : येथील मार्केट यार्डातील अडत व्यापारी राजकुमार रमेशचंद्र सारडा (वय ४२, रा. गुजराथी शाळेजवळ, धामणी रस्ता, सांगली) याने यार्डातील १२ व्यापाऱ्यांकडून हळद घेऊन तिचे पैसे न देता २७ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार आज, शनिवारी उघडकीस आला. १३ मे ते २७ डिसेंबर २०१३ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी सारडाविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची यार्डात अक्षय अॅग्रो मार्केटिंग ही फर्म आहे.फसगत झालेल्या १२ व्यापाऱ्यांतर्फे शीतल महावीर धावते (रा. हेरंब अपार्टमेंट, धामणी रस्ता, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. फसगत झालेल्या व्यापाऱ्यांमध्ये सरताज ईलाही तांबोळी (अमन ट्रेडर्स), मोहंमदअली रमजानअली भोजानी (एमआर सन्स), राजेंद्र पुंडलिक पाटील (अमित सेल्स कॉर्पोरेशन), सुनीता प्रदीप पाटील (प्रदीप मलगोंडा पाटील फर्म), दिलीप पोपटलाल मालू (दिलीप ट्रेडर्स), नितीन राजेंद्र मेणकर (सातारा ट्रेडर्स), बसवराज तुकाराम कोरे (अक्षय ट्रेडिंग कंपनी), नटवरलाल अमृतलाल पारेख, चंद्रकांत पोपटलाल मालू (कपिल ट्रेडर्स), संदीप कांतिलाल दोशी (शहा कांतिलाल वीरचंद ट्रेडर्स), अप्पासाहेब दादा पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांची ४७ हजारांपासून ते सहा लाखांपर्यंत फसवणूक झाली आहे.धावते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची मार्केट यार्डात पत्नीच्या नावाने श्री जिनवाणी ट्रेडिंग कंपनी नावाची फर्म आहे. मात्र, फर्मचा कारभार स्वत: पाहतात. या फर्ममार्फत ते शेतकऱ्यांनी घातलेल्या मालाची कमिशनच्या मोबदल्यावर अडत व्यापाऱ्यांना विक्री करतात. १३ मे रोजी संशयित सारडा याने ३२ पोती हळद खरेदी केली. तिची किंमत १ लाख ४४ हजार ७०१ रुपये आहे. १९ मे रोजी ७९ पोती हळद खरेदी केली. तिची किंमत ७९ हजार रुपये आहे. त्यानंतर पुन्हा ३१ मे रोजीही ४० पोती हळद खरेदी केली. तिची किंमत ४ लाख १६ हजार आहे. हळद खरेदीचे पैसे सारडाने अॅक्सिस बँकेच्या नावाने तीन धनादेशांद्वारे दिले होते. धावते यांनी बॅँकेत धनादेश जमा केले; मात्र ते वटले नाहीत. त्यामुळे सारडाने पुन्हा तीन धनादेश दिले. तेही वटले नाहीत. अन्य व्यापाऱ्यांचीही अशाच प्रकारे फसवणूक केली आहे. (प्रतिनिधी)
हळद व्यापाऱ्यांना २७ लाखांचा गंडा
By admin | Updated: August 17, 2014 00:45 IST