मिरज : मिरज तालुक्यातील ६४ गावांतील मागासवर्गीय वस्तीच्या कामासाठी २५ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. ६४ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ४३ गावांतील ६ कोटी ८४ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. या कामांचा ४ कोटी १० लाखांचा पहिला हप्ता मिरज पंचायत समितीकडे वर्ग झाल्याने विकास कामांतून मागासवर्गीय वस्त्यांचा कायापालट होणार आहे, अशी माहिती मिरज पंचायत समितीत सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती अनिल आमटवणे यांनी दिली.
ते म्हणाले, अनुसूचित जाती व नवबौध्द वस्तीच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळत असल्याने गटविकास अधिकारी आप्पासो सरगर यांनी ६४ गावांतील दलित वस्तींचा विकास साधण्यासाठी ३६४ कामांचा २५ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला आहे. पंचायत समिती कार्यकाळात २५ कोटी इतक्या मोठ्या रकमेचा प्रथमच प्रस्ताव जिल्हा परिषद प्रशासनाकडे दाखल केला आहे. ३६४ कामांपैकी पहिल्या टप्प्यात ४३ गावातील १४६ कामांसाठी ६ कोटी ८४ लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. मंजूर कामाचा ४ कोटी १० लाखाचा पहिला हप्ता पंचायत समितीकडे वर्ग करून घेण्यात प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित प्रस्तावांनाही मंजुरी घेण्यासाठी गटविकास अधिकारी सरगर यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या भरीव निधीमुळे मागासवर्गीय वस्त्यांचा कायापालट होणार आहे.