लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा पाटबंधारे विभागांतर्गत असणारा मोरणा मध्यम प्रकल्प, तसेच सहा लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये केवळ २४५.६५ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तसेच २२ पाझर तलाव कोरडे पडल्याने पाणी परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे उपसाबंदीचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत पाटबंधारे विभागाकडून नियोजन करण्यात येत आहे.
शिराळा शहरासह आसपासच्या सहा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या मोरणा मध्यम प्रकल्पामध्ये २० टक्के, करमजाई तलावात ८३ टक्के, अंत्री बुद्रुक तलावात २३ टक्के, शिवणी तलावात १० टक्के, टाकवे तलावात १९ टक्के, रेठरे धरण तलावात एक टक्के, कार्वे तलावात १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. रेठरे धरण तलावातून शेतीसाठी पाणी बंद करण्यात आले आहे. फक्त पिण्यासाठी पाणी वापरले जात आहे.
वाकुर्डे बुद्रुक करमजाई तलावात वाकुर्डे योजनेचे पाणी आल्याने तेथे पाणी आले आहे, तसेच येथून अंत्री बुद्रुक तलावात पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, गेली दोन दिवस वीज पुरवठा खंडित झाल्याने वाकुर्डे योजनेचे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे अंत्री तलावातून पाणी सोडण्यात आले नाही.
काेट
तालुक्यातील २२ पाझर तलाव कोरडे पडले असून, इतर पाझर तलावामधील पाणीपातळी खालावली आहे.
एप्रिल महिन्यातच पाण्याची बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा. १ मार्चपासून रेठरे धरण तलावातील पाणी शेती वापरासाठी बंद केले आहे.
- एस. डी. देसाई
शाखा अभियंता, शिराळा
मोरणा प्रकल्प