सांगली : पलूस येथील रेश्मा शेख व जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील रुपाली पवार या मृत महिलांच्या मृतदेहांची हेळसांड केल्याप्रकरणी सांगली शहर व विश्रामबाग पोलिसांनी आज, शनिवार २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दलित महासंघ व रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. पोलीस स्वत: फिर्यादी होऊन दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत. रेश्मा शेख यांचा बुधवारी सकाळी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. मृतदेह विच्छेदन तपासणी करुन न घेता नातेवाईकांनी ताब्यात घेतला होता. मृतदेह दफन करण्यास नेल्यानंतर तिच्या माहेरकडील व दलित महासंघाचे कार्यकर्ते गेले होते. त्यांनी शवविच्छेदन तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले होते. दलित महासंघाने, पलूस पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुन पलूसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्यावर तसेच शासकीय रुग्णालयातील डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी करुन सांगलीत मृतदेहासह मोर्चा काढला होता. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्याचा प्रयत्न केला होता. दलित महासंघाने तब्बल दोन दिवस मृतदेहाची हेळसांड केली. मोर्चा काढून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ठेवून पोलिसांनी सतीश मोहिते, अजित भोरे, बंडू कुरणे, बालाजी कांबळे, सागर जगदणे व अन्य अनोळखी अशा १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रुपाली पवार यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृतावस्थेत त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. पतीच्या संमतीने रुग्णालयात रुपाली यांचे नेत्रदान करुन घेतले होते. माहेरकडील लोकांना ही बाब खटकली. त्यांनी आमची का परवानगी घेतली नाही, अशी विचारणा करुन गोंधळ घातला होता. रुग्णालय चौकात स्वत:ची वाहने आडवी उभी करुन रास्ता रोको केला होता. या सर्व घडामोडीत मृतदेह तब्बल दहा ते बारा तास शवागृहात पडून होता. त्यांच्या या कृत्याने मृतदेहाची हेळसांड झाली. यामुळे सुरेश दुधगावकर, रत्नाकर नांगरे यांच्यासह पाच ते सहा अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.कायदा व सुव्यवस्थेला आव्हानपलूसच्या रेश्मा शेख यांचा मृत्यू होऊन मृतदेह दफन करण्यास नेला होता. असे असताना संशयितांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो दोन दिवस फिरवत ठेवला. सांगलीत मृतदेहासह मोर्चा काढला. रुपाली पवार यांच्या पतीचे संमतीपत्र असूनही माहेरच्या लोकांचे संमतीपत्र का घेतले नाही, असा जाब विचारुन यंत्रणेला चार ते पाच तास वेठीस धरले. या दोन्ही प्रकरणात संशयितांनी कायदा व सुव्यस्थेला एकप्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृत्याने शांततेता भंग झाला. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीसच फिर्यादी होऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अशी कारवाई पहिल्यांदाच झाली आहे.
सांगलीत २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Updated: February 1, 2015 00:51 IST