सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात शनिवारी दिवसभरात १५६ व्यक्तींना कोरोना लागण झाल्याचे दिसून आले. दिवसभरात दीडशे लोकांना गृह विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या.
महापालिका क्षेत्रात १७ एप्रिलअखेर एकूण १ हजार १९५ रुग्ण असून, त्यापैकी १ हजार ९१ व्यक्ती गृह विलगीकरणात, तर उर्वरित वेगवेगळ्या कोविड रुग्णालयांत उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जनतेने काळजी घ्यावी आणि लक्षणे असणाऱ्यांनी तातडीने कोविड तपासणी करून घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शनिवारी दिवसभरात १५६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. याबाबत आयुक्त म्हणाले की, कोरोनाची लक्षणे असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. जनतेने काळजी घ्यावी. कोणाला कोरोनासदृश लक्षणे असतील तर त्यांनी तातडीने तपासणी करून घ्यावी. गृह विलगीकरणातील व्यक्तींनी नियमांचे पालन करावे. बाहेर पडू नये. नागरिकांनीही तातडीच्या कामाशिवाय बाहेर पडू नये. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक काळजी घ्यायला हवी. महापालिकेच्या दवाखान्यात आरटीपीसीआरची सोय करण्यात आली असून, लोकांनी लक्षणे आढळल्यास संबंधित सेेंटरमध्ये तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही कापडणीस यांनी केले.