फोटो : मिरज मीरासाहेब दर्गा
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या मिरजेतील राजा मिर्झा मिरासाहेब दर्गा परिसराच्या विकासाला लवकरच चालना मिळणार आहे. महापालिकेने या परिसराच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यावर मंगळवारी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात दर्गा परिसर विकासासाठी निधीची तरतूद होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी ऑनलाईन उपस्थित राहणार आहे. लाखो हिंदू-मुस्लिम बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या मीरासाहेब दर्गा परिसराचा विकास करण्याची मागणी काही वर्षांपासून होत आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने दर्गा परिसर विकास आराखडा तयार केला आहे.
याबाबत आयुक्त कापडणीस म्हणाले की, मिरजेतील दर्गा परिसराचा विकास व्हावा यासाठी महापालिकेने प्राथमिक आराखडा तयार केला आहे. मीरासाहेव दर्गा मूळ इमारतीचे विस्तारीकरण व सुशोभीकरण, नियोजित इमारतीचे मजबुतीकरण, दर्गा परिसरातील मुख्य रस्ते, जोड रस्त्यांचे काँक्रिटकरण, पंढरपूर रस्त्यालगत शाही दर्गाचा विकास या बाबींचा समावेश आराखड्यात केला आहे. या आराखड्याबाबत मंगळवारी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार व पालकमंत्री जयंत पाटील यांनी बैठक आयोजित केली आहे. बैठकीत दर्गा परिसर विकासावर चर्चा होणार आहे. त्यानंतर मंत्र्यांच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया पार पाडली जाईल. याशिवाय कुपवाड येथील वारकरी व सार्वजनिक वापरासाठी सुविधा विकसित करण्यावरही चर्चा होईल.
चौकट
असा आहे आराखडा
* मीरासाहेब दर्गा मूळ इमारत विस्तारीकरण व सुशोभीकरण, जुन्या वास्तूंचे मजबुतीकरण : ८६.११ कोटी
* दर्गा परिसरातील मुख्य रस्ते व गावठाणातील जोडरस्ते दिवाबत्तीच्या सुविधेसह काँक्रिटकरण : ३३.१८ कोटी
* पंढरपूर रस्त्यालगत शाही दर्गा व परिसरअंतर्गत दोन भूखंडांचा विकास : १९.३८ कोटी
* कुपवाड येथील आरक्षित जागेवर वारकरी व सार्वजनिक वापरासाठी सुविधा व बगीचा विकास : १७.६८ कोटी