मिरज : गेल्या चार महिन्यांपासून महापालिकेच्या शाळांतील कार्यरत शिक्षकांचे थकित वेतन व व निवृत्त शिक्षकांच्या थकित निवृत्तीवेतनाची दीड कोटींची रक्कम शिक्षण मंडळाकडे वर्ग करण्यात आली आहे. महापालिकेने रक्कम वर्ग केल्याने निवृत्त शिक्षकांच्या संघटनेतर्फे करण्यात आलेले धरणे आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती संघटनेचे सुभाष माळी यांनी दिली. महापालिकेकडे कार्यरत शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचे मानधन मे महिन्यापासून केवळ शासनाकडून येणाऱ्या ५० टक्के अनुदानातून देण्यात येत होते. महापालिकेच्या हिश्श्याची ५० टक्के रक्कम शिक्षकांना देण्यात येत नव्हती. महापालिकेच्या हिश्श्याची १ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम थकित होती. थकित वेतन व निवृत्तीवेतन मिळण्यासाठी निवृत्त शिक्षक संघटनेने बुधवारी शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनास शिक्षक समितीचे किरण गायकवाड यांच्यासह शिक्षकांनी पाठिंबा दिला. आंदोलनानंतर महापालिकेने शिक्षकांची थकित १ कोटी ६० लाख रुपयांची रक्कम शिक्षण मंडळाकडे वर्ग केली आहे. महापालिकेने रक्कम वर्ग केल्याने शिक्षक संघटनेतर्फे करण्यात येणारे आंदोलन मागे घेण्यात आले. शिक्षकांचे वेतन हे दरमहा दहा तारखेपूर्वी शिक्षकांना देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याचेही सुभाष माळी यांनी सांगितले. संघटनेचे सचिव बलराम पवार, नेमिनाथ आडमुठे, बी. एम. पाटील, आण्णाप्पा लोणकर, आनंदराव जाधव, शहानवाज लतीफ, सौ. अवंतिका जोशी, अशोक शिंदे, सुरेंद्र चौगुले, मन्सूर मुतवल्ली, शहाजहान तांबोळी, जबी पटेल, किस्मत पटेल, अरुण कदम सहभागी झाले. (वार्ताहर)
शिक्षकांचे दीड कोटी शिक्षण मंडळाकडे
By admin | Updated: July 24, 2014 23:27 IST