पलूस : मागील हंगामात क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याकडे गाळपास आलेल्या उसाच्या एफआरपीच्या रकमेपोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर १४४ रुपयांप्रमाणे १२ कोटी ७२ लाख ९६ हजार ५६९ रुपये वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती अध्यक्ष आमदार अरुण लाड यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले की, कारखान्याने १४६ दिवसांत ८ लाख ८४ हजार टन ऊसगाळप केले होते. पहिली उचल म्हणून कारखान्याने २७५० रु. प्रतिटन देण्यात आली आहे. आता १४४ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करीत आहोत. कोरोना प्रादुर्भावामुळे साखर विक्री मंदावली आहे. केंद्र सरकारकडून साखर निर्यातीचे व बफर स्टॉकचे अनुदान, महावितरण कंपनीकडून येणे असलेल्या वीज बिलाची रक्कम अद्याप मिळालेली नाही. तरीही एफआरपीपोटी हा हप्ता जमा केला आहे. उर्वरित रक्कम लवकरच देत आहोत.
यावेळी उपाध्यक्ष उमेश जोशी, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड, संचालक दिलीप पाटील, पोपट संकपाळ, अंकुश यादव, संदीप पवार, दिगंबर पाटील, नारायण जगदाळे, अरुण कदम, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे आदी उपस्थित होते.