लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना जिल्हा परिषदेकडून नव्याकोऱ्या सुसज्ज रुग्णवाहिका मिळणार आहेत. मिनीबस स्वरूपातील या रुग्णवाहिकांसाठी दोन कोटी ८० लाख रुपयांची तरतूद जिल्हा परिषदेने केली आहे.
अध्यक्षा प्राजक्ता कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही माहिती दिली. सध्या या आरोग्य केंद्रांकडे जुनाट रुग्णवाहिका असून, त्या भंगारात काढण्यात आल्या आहेत. लाभार्थी आरोग्य केंद्रे अशी : भिलवडी, खंडेराजुरी, आटपाडी, मांगले, शिरशी, कामेरी, येडेमच्छिंद्र, देशिंग, रांजणी, आगळगाव, कोंत्येव बोबलाद, वळसंग, बिळूर व येळवी. चौदाव्या वित्त आयोगातून यासाठी तरतूद करण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात ग्रामपंचायतींना दिलेल्या चौदाव्या वित्त आयोगातील बराच निधी अखर्चित राहिला होता, तो शासनाकडे परत जाण्याची शक्यता होती. तो जिल्हा परिषदेने संकलित केला. त्यातून रुग्णवाहिकांसाठी तरतूद करण्यात आली.
------------