इस्लामपूर : वाळवा तालुक्यात गेल्या ७ दिवसांत १३९२ इतक्या नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर २६ जणांचा मृत्यू झाला आहे. १४ जूनला रुग्णांची संख्या २९१ पर्यंत पोहोचल्याने सर्वांचेच धाबे दणाणले होते. पुन्हा पुढचे दोन दिवस रुग्णसंख्या ही २००च्या वरच राहिली होती. त्यानंतर १७ जूनपासून या रुग्णसंख्येला उतार लागला आहे. रविवारी २० जूनला ही संख्या ११७ पर्यंत खाली आली होती. गेल्या ७ दिवसांतील मृत्युदराचे प्रमाण १.८६ टक्के इतके होते.
तालुक्यात पहिल्या लाटेपासून आतापर्यंत १८ हजार ७२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील १६ हजार ६८० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९२.२९ टक्के इतके आहे. तर आज अखेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील ४३५ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्लामपूूर आणि आष्टा या शहरातील १८० जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. तालुक्याचा सरासरी मृत्युदर ३.४० टक्के इतका आहे. ग्रामीण भागातील हा मृत्युदर २.४० टक्के तर शहरी भागात त्याचे प्रमाण ०.९९ टक्के इतके कमी राहिले आहे.
वाळवा तालुक्यतील काही गावे ही कोरोनाचे हॉटस्पॉट बनली होती. त्यामुळे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ही बाब गांभीर्याने घेत प्रशासनाला कठोर उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी त्यांनी स्वत: या गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांचे मनोधैर्य उंचावतानाच कोरोना नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले होते. जि.प.चे मुुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दोन वेळा तालुक्याचा दौरा करत आरोग्य यंत्रणेला कामाला लावले होते. कोरोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी कोरोनाची तपासणी वाढवितानाच कोरोनाबाधित रुग्णांवर लक्ष केंद्रित केले आहे.