(Image Credit : parentcircle.com)
लहान मुलं अभ्यास करत नसल्याची अनेकदा पालक तक्रार करत असतात. मग त्यांनी अभ्यास करावा म्हणून त्यांच्यावर ओरडलं जातं किंवा त्यांना काहीतरी आमिष दिलं जातं. जर लहान मुलांनी चांगला अभ्यास करावा असं तुम्हाला वाटत असेल तर एका रिसर्चमधून एक भन्नाट उपाय सांगण्यात आला आहे. जास्तीत जास्त पालक हे लहान मुलं अभ्यास करताना पाळीव प्राण्यांना दूर ठेवतात, जेणेकरून मुलांचं अभ्यासातच लक्ष लागावं.
अशात कॅनडातील यूबीसी ओकानागन स्कूल ऑफ एज्युकेशनच्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, जेव्हा लहान मुलांच्या आजूबाजूला पाळीव कुत्रे असतात तेव्हा त्यांचं अभ्यासात जास्त लक्ष लागतं. तसेच ते लवकर नवीन गोष्टी शिकून लक्षात ठेवतात. त्यांचा अभ्यासातील इंट्रेस्टही अधिक वाढतो.
कसा केला रिसर्च?
हा रिसर्च १७ लहान मुला-मुलींवर करण्यात आला. यात पहिले ते तिसरीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सगळ्यांना आधी एकट्यात अभ्यास करण्यास करण्यात सांगण्यात आले आणि नंतर अभ्यासादरम्यान त्यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्रा ठेवण्यात आला. अभ्यासकांनी विश्लेषण केलं की, कुत्र्यांच्या उपस्थितीत आणि अनुपस्थितीत लहान मुलांचा अभ्यास कसा झाला.
संशोधक केमिली रूसो यांनी सांगितले की, 'आमच्या रिसर्चमधून यावर जास्त लक्ष देण्यात आलं की, लहान मुलांना जास्त वेळ अभ्यास करण्यासाठी प्रेरित केलं जाऊ शकतं का आणि अभ्यास करताना कुत्रा सोबत असेल तर अडचणी सहजपणे पार केल्या जाऊ शकतात'. रिसर्चमध्ये मुलांना आधी वाचण्यास सांगण्यात आले. नंतर काही असं करण्यास सांगण्यात आलं जे त्यांना माहीत नव्हतं.
यावेळी मुलांना सांगण्यात आले की त्यांनी एखाद्या डॉग हॅंडलरला, पाळीव प्राण्याला किंवा आणखी कुणाला पुस्तक वाचून दाखवा. कुत्र्यांच्या उपस्थितीत त्यांना अभ्यास सुरूच ठेवण्यास सांगण्यात आले. यात मुलांनी अधिक इंटरेस्ट दाखवला आणि त्यांना चांगलं वाटलं.
रूसो यांनी सांगितले की 'असे अनेक रिसर्च करण्यात आले. ज्यातून हे समोर आले की, विद्यार्थ्यांची अभ्यासाची क्षमता वाढवण्यासाठी कुत्र्यांची मदत मिळते'. रूसो यांनी आशा व्यक्त केली आहे की, या रिसर्चमुळे अनेक संस्थांना हे समजेल की, कुत्र्यांसोबत अभ्यास केल्याने लहान मुलांना स्वत:ला प्रेरित करण्यास मदत मिळेल.