आवाशी : खेड तालुक्यातील लाेटे औद्याेगिक वसाहतीतील घरडा कंपनीत झालेल्या स्फाेटाने लागलेल्या आगीचे कारण शाॅर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज सुरक्षा विभाग व कंपनी व्यवस्थापनाकडून वर्तविला जात आहे. कंपनीतील दुर्घटनेची दखल घेऊन कंपनीतील प्लॅंट ७ मधील उत्पादन बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात आले आहेत.
लाेटे - परशुराम (ता. खेड) औद्याेगिक वसाहतील घरडा केमिकल्स या कंपनीत शनिवार, २० राेजी सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या स्फाेटाने आग लागून चार कामगारांचा मृत्यू झाला तर एकजण गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर नवी मुंबईतील ऐराेली येथे उपचार सुरू आहेत. अभिजीत कवडे (रा. चिपळूण) असे त्यांचे नाव असून, कंपनी व्यवस्थापनाकडून त्याची देखभाल घेतली जात आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू असून, त्याच्या प्रकृतीत सुधारणा हाेत असल्याचे संकेत त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती आर. सी. कुलकर्णी यांनी दिली आहे.
या घटनेनंतर सुरक्षा निरीक्षक सुरेश जाेशी यांच्याशी रविवारी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता शनिवारी रात्री उशिरापर्यंत कंपनीत तपासणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जेथे अपघात घडला, त्या रिॲक्टरमध्ये मटेरियल शिल्लक असून, अपघाताचे ठाेस कारण शाेधण्याचे काम सुरू आहे. मात्र, तरीही आग शाॅर्टसर्किटने लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. काही अवधीतच याेग्य कारण समाेर येईल, असे त्यांनी सांगितले. अशीच पध्दतीची माहिती घरडाचे युनीट हेड आर.सी. कुलकर्णी यांनीही भ्रमणध्वनीवरुन दिली.
कंपनीतील ज्या आर ॲण्ड विभागातील प्लॅंट नं. ७ येथे अपघात झाला आहे. ताे आर ॲण्ड विभाग पूर्णपणे बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. सुरक्षा निरीक्षकांच्या पाहणी अहवालानंतरच त्यांच्या परवानगीने ताे विभाग सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चिपळूण येथील उपविभागीय अधिकारी अजय चव्हाण यांनी दिली. त्यामुळे तूर्त तरी हा विभाग बंद ठेवण्यात आला.