मंडणगड : कुंबळे ग्रामपंचायतीने प्रशासनाच्या मदतीने अतिशय उत्तम सांघिक कार्य केले आहे. कुंबळे ग्रामीण बाजार व ग्रामपंचायतीचे नवीन कार्यालय ही अत्यंत लोकोपयोगी कामे आहेत, अशा शब्दांत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी विशेष कौतुक केले. कुंबळे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून त्या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुंबळे ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर दळवी यांनी भूषविले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ‘नाबार्ड’च्या जिल्हा प्रबंधक श्रद्धा हजिरनीस, सभापती स्नेहल सकपाळ, पंचायत समितीचे सदस्य नितीन म्हामुणकर, गटविकास अधिकारी आर. एम. दिघे, हेमंत भिंगारदिवे, शाखा अभियंता देवकीनंदन सकपाळे, विष्णू पवार, उपसरपंच रवींद्र दळवी, ग्रामपंचायत सदस्य शमिम चिखलकर, महेंद्र पाटील, संगीता खैरे, समीक्षा लोखंडे, नंदा शिंदे, तंटामुक्त ग्राम समिती अध्यक्ष सदानंदर खैरे, पोलीस पाटील नूरहसन कडवेकर, ग्रामसेवक शरद बुध यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत ताळमेळ साधत ग्रामपंचायतीने विकासाची संकल्पना पुढे नेली आहे. चांगले काम करताना नेहमीच अडचणी येतात. त्यावर मात करून मिळविलेले यश सर्वोत्तम असते, असे सांगत डॉ. जाखड यांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्या कामाचे कौतुक केले.
नाबार्डच्या श्रद्धा हजिरनिस यावेळी म्हणाल्या की, शेतकरी व महिला बचत गटांना आपले उत्पादन विकण्याची संधी बाजारपेठ शेडरूपाने उपलब्ध करून देण्यात आली आहे. अडचणी सोडविण्यासाठी सरपंच व प्रशासन यांची परिषद बैठक व्हावी, अशी अपेक्षा सरपंच किशोर दळवी यांनी मांडली. ग्रामसेवक शरद बुध यांनी प्रास्ताविक, तर हरेष दळवी यांनी सूत्रसंचालन केेले.
चाैकट -
दर तीन महिन्यांनी सरपंच बैठक
पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दर तीन महिन्यांनी सरपंच बैठक घेण्याचा निर्णय झाला असून, यामुळे सरपंचांना आपल्या समस्या व मुद्दे प्रशासनाकडे मांडण्याची संधी उपलब्ध झाली आहे. अनेक ठिकाणी जमिनीची मालकी जिल्हा परिषदेची नसल्याने निधी खर्च करण्यात अडचण येते. लोकल बोर्ड, सरकारी व खासगी जागांवर निर्माण करण्यात आलेल्या मालमत्तेच्या जागा स्वमालकीच्या व्हाव्यात, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी जाहीर केले.
...........................
फाेटाे नं. १९आरटीएन०३
फोटो ओळी-
कुंबळे बाजारपेठच्या नवीन शेडचे डॉ. इंदुराणी जाखड यांनी फीत कापून उद्घाटन केले. यावेळी नाबार्डच्या श्रद्धा हजिरनीस, सरपंच किशोर दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांसमवेत दिसत आहेत.