लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : गुहागर-विजापूर रस्त्याच्या रुंदीकरणांतर्गत असलेल्या मोडकाआगर पुलाचे काम अंतिम टप्प्यात सुरु आहे. १५ जूनपर्यंत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे सांगितले जात असले तरी एकूण कामाचा वेग लक्षात घेता, हाही मुहूर्त हुकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या पावसाळ्यातही गुहागरवासीयांना अतिरिक्त २५ किलोमीटरची वारी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.
गेल्या तीन वर्षांपासून गुहागर-विजापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. शृंगारतळी ते रामपूरदरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात रामपूर ते चिपळूण दरम्यानचे काम केले जाणार आहे. त्यासाठी नुकतेच सुमारे १७१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, अजून या कामाला सुरुवात झालेली नाही. तूर्तास ठेकेदार कंपनीने मोडकाआगर पुलाच्या कामावर लक्ष केंद्रित केले आहे. गुहागरवासीयांसाठी हा पूल तितकाच महत्त्वाचा आहे; कारण पूल नसल्याने विनाकारण २५ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास पालपेण, रानवी व पवारसाखरीमार्गे करावा लागतो. साधारण २४ एप्रिल २०२० रोजी या पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. तेव्हापासून गुहागर शृंगारतळी मार्ग बंदच आहे. तूर्तास या पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अजूनही जोडरस्ता व संरक्षक भिंतीचे काम अपूर्ण आहे. हे काम पावसाच्या आधी पूर्ण करण्यासाठी खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव पाठपुरावा करीत आहेत. मात्र तरीही या कामाचा वेग वाढलेला नाही. त्यामुळे या पुलासाठी अंतिम टप्प्यात काढलेला मुहूर्तही हुकण्याची चिन्हे आहेत.
---------------------------
नकाेसा प्रवास
आतापर्यंत वरवेलीने केले साहाय्य गुहागर ते शृंगारतळी दरम्यानच्या आठ किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी २५ किलोमीटरचा प्रवास अनेकांना नकोसा झाला आहे. त्यामुळे मोडकाआगर नजीकच्या वरवेली ग्रामस्थांनी आपल्या खासगी जागेतून रस्ता दिला होता. त्यामुळे केवळ ९ किलोमीटरचा प्रवास होत होता. मात्र आता तोही मार्ग बंद झाल्याने आमदार जाधव यांच्या प्रयत्नाने मोडका आगर पुलानजीक भराव करून सेतू उभारला आहे. पावसाळ्यात तोही टिकणार नसल्याने पुलाचे काम तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे.