रत्नागिरी : पटसंख्येच्या अभावी जिल्ह्यातील ५० आठवीचे वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गतवर्षी चौथीच्या शाळांना पाचवी व सातवीच्या शाळांना आठवीचे वर्ग जोडण्यात आले होते. प्राथमिक शाळांना २३० आठवीचे वर्ग जोडले गेले होते. मात्र हायस्कूलकडे असलेला विद्यार्थ्यांचा ओढा लक्षात घेता ५० वर्गाला याचा फटका बसला आहे.शासनाकडून मोठा गाजावाजा करुन प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय अंमलबजावणीही जिल्ह्यात करण्यात आली. पदवीधर शिक्षकांअभावी पहिले वर्ष रडत खडत पूर्ण करण्यात आले. मात्र यावर्षी आठवीच्या वर्गाला फटका बसला आहे.गतवर्षी २३० आठवीचे वर्ग सुरु करण्यात आले. त्यापैकी यावर्षी ५० वर्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुरु असलेल्या आठवीच्या वर्गात पाल्याला न घालण्याचा पालकांचा कल लक्षात घेता भविष्यात अन्य वर्गांनाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे.ज्या प्राथमिक शाळांमध्ये आठवीचे वर्ग जोडण्यात आले आहेत त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक सोईसुविधा, पदवीधर शिक्षक असणे गरजेचे आहे. मात्र शैक्षणिक सोईसुविधा तसेच प्रयोगशाळा यांचा अभाव दिसून येत आहे. जिल्हा परिषदेकडून या सुविधा पुरविल्या न गेल्याने विद्यार्थ्यांची परवड झाली आहे.समाजातील सर्व घटकांना शैक्षणिक प्रवाहामध्ये आणण्याच्या अनुषंगाने बालकांचा सक्तीचा व मोफत कायदा शासनाने सुरु केला. अंमलबजावणीदेखील सुरु करण्यात आली. मात्र संबंधित अंमलबजावणी करीत असताना काही शाळांना पटसंख्येचा फटका बसला आहे. सुरवातीला विद्यार्थी व पालकांकडून आठवीच्या वर्गाला प्रतिसाद मिळाला. मात्र वर्षभरामध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागल्याने विद्यार्थ्यांनी या वर्गाकडे पाठ फिरविली आहे. भविष्यात अन्य आठवीच्या वर्गांनादेखील याचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील वर्षी आता या सर्व गोष्टींचा त्रास विद्यार्थ्यांना होणार आहे. जिल्हापरिषद मराठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेश घेण्याची संख्या कमी असून या सर्व पार्श्वभूमिवर आठवीच्या ५० वर्गावर बंंंद पडण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलणार कधी असा प्रश्न विचारला ्जात आहे. (प्रतिनिधी)पटसंख्येचा प्रश्न गंभीरशासनाकडून पूर्व प्राथमिक शाळांना पाचवीचे वर्ग जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.आठवीच्या वर्गाची अवस्था गंभीर आहे. प्राथमिक शाळांना २३० वर्ग जोडले गेले मात्र त्यापैकी ५० वर्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. आठवीचे वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणीही मोठ्या प्रमाणावर करण्यात आली . मात्र या सर्वाची परिणती वर्ग बंद होण्यात झाली आहे. आता पुढे काय होणार हा प्रश्न आहे. गुहागरातील दहा शाळांमध्ये पाचची पटसंख्याअसगोली : गुहागर तालुक्यातील दहा शाळांमध्ये पाच विद्यार्थी आहेत. दुर्गम भागातील या शाळा बंद पडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या शाळांमधील पट कमी होत असल्याने या शाळा अन्य शाळांमध्ये विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गुहागर तालुक्यातील १० शाळांमध्ये पाच पट असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या मुलाला चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून पालक शहरांकडे धाव घेत आहेत.गुहागर तालुक्यातील १ ली ते ४ थीच्या १० शाळांमध्ये यावर्षी पटसंख्या ४ ते ५ वर आली आहे. यामध्ये मासू शाळा क्र. ३ मध्ये ५ मुले व २ शिक्षक, पेवे आमशेतभाई येथे ४ मुले व २ शिक्षक, पेवे गुरवकोंड येथे २ मुले व १ शिक्षक, वेलदूर उर्दूमध्ये ५ मुले व २ शिक्षक, झोंबडी शाळा क्र. २ मध्ये ५ मुले व २ शिक्षक, पोमेंडी आडीमध्ये ५ मुले व २ शिक्षक, उमराठ शाळा क्र. २ मध्ये २ मुले २ शिक्षक, पाली शाळा क्र. २ मध्ये ५ मुले व २ शिक्षक, कुटगिरी शाळा क्र. २ मध्ये ५ मुले व २ शिक्षक, तर सुरळ उर्दू शाळेमध्ये ५ मुले व २ शिक्षक अशी स्थिती आहे. येथील कमी पटसंख्या असली तरी येथील विद्यार्थ्यांसाठी या शाळा महत्वाच्या ठरल्या आहेत. (वार्ताहर)
आठवीचे वर्गच संकटात येणार? गुहागरातील दहा शाळांमध्ये पाचची पटसंख्या
By admin | Updated: June 22, 2015 00:23 IST