दापोली : गेल्यावर्षी झालेल्या निसर्ग चक्रीवादळात नादुरुस्त झालेल्या व अद्याप लोंबकळत असणाऱ्या विजेच्या तारांबाबत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष मकरंद म्हादलेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना दिला आहे.
याबाबत ते म्हणाले की, गेल्यावर्षी कोकणाला निसर्ग चक्रीवादळाने जोरदार फटका दिला. जिल्ह्यात याचा सर्वाधिक फटका दापोली, मंडणगड या दोन तालुक्यांना बसला आहे. दापोली तालुक्यात त्यावेळी अनेक झाडे विजेच्या तारांवर पडल्याने तालुक्याचा वीजपुरवठा अनेक दिवस बंद होता. त्यानंतर तुटलेले विजेचे खांब बदलण्यात आले. मात्र, काही विजेचे खांब चांगले होते ते तसेच ठेवण्यात आले, पण त्यावरील तारा कट करण्यात आल्या आणि या विजेच्या खांबांवर नवीन तारा बसवण्यात आल्या. त्यावेळी तुटलेल्या व कट करण्यात आलेल्या तारा अद्यापही लोंबकळत आहेत. तालुक्याला आणखी एका चक्रीवादळाचा फटका बसला आहे. अशीच जर आणखी नैसर्गिक आपत्ती आली तर या लोंबकळणाऱ्या तारांमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे या लोंबकळणाऱ्या विजेच्या तारा तत्काळ काढून टाकण्यात याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मकरंद म्हादलेकर यांनी दिला आहे.