लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा मराठा क्रांती मोर्चातर्फे व सकल मराठा समाजातर्फे सत्कार करण्याची तयारी करण्यात आली आहे. मी स्वतः मराठा क्रांती मोर्चा समितीचा कार्यकर्ता आहे. मात्र, मला याबाबतची कोणतीही माहिती नाही व कल्पनाही देण्यात आली नाही. एवढ्या घाईगडबडीत व एका दिवसात या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्याचा एवढा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न मराठा क्रांती मोर्चा समिती सदस्य व शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले की, केवळ एका दिवसातच या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. पुरेसा अवधी न देता हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. व्यक्तीश: मला मराठा क्रांती मोर्चा चिपळूण तालुक्याचा कार्यकर्ता म्हणून हे अजिबात पटलेले नाही व याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. किंबहुना मी असे म्हणेन की, या सत्कार सोहळ्याशी मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही दुरान्वये संबंध नाही. हा केवळ काही लोकांनी आयोजित केलेला सत्कार सोहळ्याचा प्रयोग आहे. वास्तविक भाजपची जनआशीर्वाद यात्रा हा राजकीय कार्यक्रम असताना त्यामध्ये जबरदस्तीने हा सत्कार सोहळा घुसवून कोणाला काय साध्य करायचे आहे, हे कळत नाही.
मुळात आरक्षणाला असलेली ५० टक्केची अट शिथिल करण्यासाठी लोकसभेत चर्चा सुरू असताना एकाही भाजप सदस्याने साधे तोंडही उघडले नाही. अथवा स्वतः नारायण राणे यांनीही याबाबत अवाक्षर काढले नाही. म्हणजेच या लोकांनी मराठा समाजाबरोबर चक्क विद्रोह केला आहे, असे माझे स्पष्ट मत असल्याचे बाळा कदम यांनी सांगितले. तालुक्यातील मराठा समाजाला वेठीस धरून किंवा त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी आपला अशाप्रकारे स्वार्थ साधू नये व तसा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही. आतापर्यंत भाजपच्या यात्रेतच अशा प्रकारे मराठा समाजातर्फे सत्कार सोहळ्याचे आयोजन कोणत्याही मराठा समितीने केलेले नाही. ही बाबही तेवढीच अधोरेखित होत आहे. नारायण राणे यांचा सत्कार सोहळा व अन्य मान्यवर अन्य मराठा समाजातील नेत्यांचा सत्कार वेगळ्या पद्धतीने आणि नियोजनबद्धरीत्या करता आला असता. परंतु, हे सर्व टाळून अचानक समाजाचे नाव वापरून जे प्रकार सुरू आहेत ते मला मान्य नाही, असेही कदम यांनी सांगितले.