शिवाजी गोरे/दापाेली : तालुक्यातील बांधतिवरे, लाडघर, चंद्रनगर, आसूद या ठिकाणचे धबधबे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. पर्यटनाच्या साैंदर्यात भर घालणाऱ्या या धबधब्यांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा मात्र अभाव आहे. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कोरोना लॉकडाऊनमुळे पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आल्यामुळे निसर्गाचे वरदान ठरलेले धबधबे निर्मनुष्य बनले आहेत. दापोली - बुरोंडी मार्गाजवळील लाडघर धबधबा अतिशय निसर्गरम्य वातावरणात ओसंडून वाहत आहे. चंद्रनगर येथील दुधेरी धबधबाही आकर्षण ठरत आहे. आजूबाजूला गर्द हिरवी झाडे, दोन्ही बाजूला डोंगर, कडेकपारी आणि दोन्ही डोंगराच्या मधोमध वाहणाऱ्या नदीवरुन हा दुधेरी धबधबा सध्या पर्यटकांना खुणावत आहे. त्याचबराेबर बांधतिवरे येथील धबधबाही खास आकर्षण ठरला आहे.
दापोली शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या आकर्षक धबधब्याकडे अनेकजण आकर्षित होत आहेत. परंतु, निसर्गाचे वरदान ठरलेल्या या धबधब्यांकडे पर्यटन विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास केल्यास निश्चितच पर्यटनाला चालना मिळू शकेल.
------------------------
साेयी-सुविधांची वानवा
काही ठिकाणी धबधब्याकडे जाण्यासाठी रस्ता नाही, पार्किंग, बैठक व्यवस्था नाही. याठिकाणी सुलभ शौचालय किंवा साधी चहाची टपरीही नसल्याने पर्यटकांचे हाल हाेतात. निसर्गाचे वरदान ठरलेल्या या धबधब्यांकडे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत तर दुसरीकडे पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना गैरसोयींचा सामनाही करावा लागत आहे.