रत्नागिरीतील पाणीपुरवठा सुरळीत : नगराध्यक्ष साळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:32 AM2021-04-08T04:32:02+5:302021-04-08T04:32:02+5:30

रत्नागिरी : गेले दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, बुधवारपासून सुरळीत झाला आहे. काही ठिकाणी वाहिन्यांमध्ये ...

Water supply in Ratnagiri smooth: Mayor Salvi | रत्नागिरीतील पाणीपुरवठा सुरळीत : नगराध्यक्ष साळवी

रत्नागिरीतील पाणीपुरवठा सुरळीत : नगराध्यक्ष साळवी

Next

रत्नागिरी : गेले दोन दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, बुधवारपासून सुरळीत झाला आहे. काही ठिकाणी वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा झाला असला तरी येत्या दोन दिवसांत पाणीपुरवठा चांगल्या दाबाने व सुरळीत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप ऊर्फ बंड्या साळवी यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

शीळ धरण येथे दोन पंप बसविण्यात आले असून, २४ तास पंप चालवूनदेखील पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लोव्ह होत नव्हत्या. मात्र, नवीन पंपामुळे टाक्या काही तासांतच भरल्या आहेत. नुकत्याच झालेल्या कामामुळे दोन ते तीन दिवस गढूळ पाण्याचा पुरवठा होऊ शकतो. मात्र, त्यानंतर शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा होणार आहे. डीएसपी लाईनजवळील टाकी सुरू करून चांगल्या पध्दतीने पाणीपुरवठा होणार आहे. शिवाय, शहरातील जुन्या टाक्या स्वच्छ करून नादुरुस्त झालेल्या भागाची दुरुस्ती व रंगकाम केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शहरातील बहुतांश ठिकाणची अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. वडापाव विक्रेत्यांनाही पार्सल विक्रीबाबतची सूचना करण्यात आली आहे. पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी नगर परिषदेच्या भरणा केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी मारूती मंदिर येथेही वसुली केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जन्म-मृत्यू दाखल्यासाठी स्वतंत्र दोन बाॅक्स तयार करण्यात येणार असून नागरिकांनी त्यामध्ये अर्ज टाकायचे आहेत. दाखल्यांबाबतच्या सूचना नागरिकांना फोनवर देण्यात येईल. त्यानंतर त्यांनी ते घेऊन जावेत. नगर परिषदेमध्ये अभ्यागतांसाठी सध्या प्रवेश बंद करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक वही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचे निवारण तत्काळ केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील रस्ता दुरस्ती व डांबरीकरणाचे काम १५ एप्रिलनंतर सुरू केले जाणार आहे.

यावेळी मुख्याध्याधिकारी प्रशांत ठोंबरे, आरोग्य सभापती निमेश नायर, नगरसेवक राजन शेट्ये आदी उपस्थित होते.

Web Title: Water supply in Ratnagiri smooth: Mayor Salvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.