लांजा :
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ग्रामपंचायत स्तरावर जिवाची पर्वा न करता काम करणाऱ्या ग्राम कृती दलाला तातडीने कोरोनाची लस देण्यात यावी, अशी मागणी पंचायत राज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषद लांजा यांच्यावतीने एका निवेदनाद्वारे तहसीलदार समाधान गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.
सध्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच कोकणामध्ये मोठ्या आनंदात साजरा करण्यात येणाऱ्या शिमगोत्सवाला मुंबई - पुणे येथून चाकरमानी मंडळी मोठ्या प्रमाणात गावी येतात. महानगरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे. हे लक्षात घेता येणाऱ्या चाकरमान्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्राम कृती दलाकडेच असल्याने खबरदारी म्हणून ग्राम कृती दलाच्या सदस्यांना कोरोनाची लस देणे गरजेचे आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उपाययोजनांमध्ये ग्राम कृती दलाचे काम जोखमीचे आहे. मागील वर्षामध्ये तालुक्यातील ग्राम कृती दलाने वाखाणण्यासारखे काम गावांमध्ये केले आहे. आपल्या पातळीवर आपण कोरोना योध्दा म्हणून गौरवण्यासारखे काम सरपंच व ग्राम कृती दलाने केले आहे. सध्या शासनाने कर्मचारी व दुर्धर आजार असलेल्या लोकांना लसीकरणाचे काम सुरू केले आहे. परंतु ग्राम कृती दलातील कार्यकर्त्याच्या लसीकरणाची मोहीम अद्यापही आपण घेतलेली नाही. प्रत्यक्ष काम करणारे सरपंच व सदस्य असून यांचे लसीकरण होणे अत्यावश्यक आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तहसीलदार गायकवाड यांना निवेदन देताना अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष शशिकांत कदम, कोअर कमिटी अध्यक्ष योगेश पाटोळे, सचिव संतोष धामणे, सहसचिव देवेंद्र लोटणकर, गणेश इंदुलकर उपस्थित होते.