रत्नागिरी : दापाेली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनाऱ्यावर स्टंटबाजी करताना थार गाडी उलटून अपघात झाल्याच्या घटनेची जिल्हा पाेलिस प्रशासनाने गंभीरतेने दखल घेतली आहे. समुद्रकिनाऱ्यावर असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी पाेलिसांनी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर वाहनांना जाण्यास बंदी घातली आहे. त्याची अंमलबजावणीही तातडीने करत समुद्रकिनाऱ्यावर जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत.पर्यटकांकडून समुद्रकिनाऱ्यावर भरधाव वेगाने वाहन चालवून स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. त्यामुळे गाड्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत फसणे, भरतीच्या पाण्यात वाहन अडकून पडणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. गतवर्षी दापाेली तालुक्यात मुरुड, हर्णेै आणि रत्नागिरीतील भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर असे प्रकार घडले हाेते. काही अतिउत्साही पर्यटक जबरदस्तीने वाहने समुद्रकिनाऱ्यावर नेऊन भरधाव वेगाने पळवण्याची स्टंटबाजी करतात, त्यामुळे अपघाताचा धाेका असताे. त्याचबराेबर इतरांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते.चार दिवसांपूर्वी दापाेली तालुक्यातील कर्दे समुद्रकिनाऱ्यावर पुणे येथील पर्यटकांनी भरधाव वेगाने थार गाडी चालवण्याचा प्रकार केला. त्यावेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी उलटली. या प्रकारानंतर जिल्हा पाेलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्वच समुद्रकिनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घातली आहे. त्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर जाणारे रस्ते बॅरिकेट्स, लाकडाचे ओंडके, जांभा चिरा टाकून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे आता समुद्रकिनाऱ्यावर वाहन नेऊन हुल्लडबाजी करणे, स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांना चाप बसणार आहे.
पाेलिस अधीक्षकांचे आवाहन
- समुद्रकिनाऱ्यावर काेणत्याही प्रकारची वाहने नेऊ नयेत अथवा चालवू नयेत.
- समुद्रकिनारी वाहन चालविणे धाेकादायक असून, अपघातास कारणीभूत ठरू शकते.
- समुद्रकिनारी वेगाने किंवा निष्काळजीपणे वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध रत्नागिरी पाेलिस दलातर्फे कठाेर कारवाई करण्यात येईल.
- समुद्रकिनारी येणारी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेला बाधा पाेहाेचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
- समुद्रकिनारी वाहतूक नियमांचे काटेकाेर पालन करावे.
- समुद्रकिनारी नियमभंग करून धाेकादायकपणे वाहन चालवताना आढळल्यास आपल्या जवळच्या पाेलिस स्थानकात किंवा डायल ११२ वर कळवावे.
- सर्व समुद्रकिनारे सुरक्षित व सुंदर ठेवण्याकरिता सर्वांनी मिळून सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे.
उपाययाेजनांबाबत संबंधित यंत्रणेचे दुर्लक्षजिल्ह्यातील बहुतांश समुद्रकिनारे ग्रामपंचायत, नगर परिषदेच्या हद्दीत आहेत. त्यांच्याकडून किनारपट्टी भागात कर आकारणीही केली जाते. मात्र, समुद्रकिनाऱ्यावर घडणाऱ्या घटनांना आळा घालण्याबाबत ग्रामपंचायत आणि नगर परिषद प्रशासनाकडून दुर्लक्ष हाेत असल्याचे समाेर आले आहे. तसेच जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटन विभागाच्या ताब्यात आहेत. त्यांच्याकडून याबाबत कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मात्र, त्यांच्याकडूनही सुरक्षिततेच्या दृष्टीने दुर्लक्ष करण्यात येत आहे.
यंत्रणांचे हात वरजिल्ह्याला सुमारे २०० किलाेमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. किनाऱ्यावर पाेलिसांची गस्त सुरू असते. मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कायमस्वरूपी कर्मचारी तैनात करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे ग्रामपंचायत, नगर परिषद अथवा पर्यटन विभागाने किनाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत उपाययाेजना करणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करता किनाऱ्यावर दुर्घटना घडल्यास पाेलिस प्रशासनाकडे बाेट दाखवून संबंधित यंत्रणा हात झटकत आहे.
बॅरिकेट्स, लाकडी ओंडके, चिऱ्यांनी रस्ता बंदरत्नागिरी तालुक्यातील आरे, काजीरभाटी, गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यांवर जाणारे रस्ते लाकडाचे ओंडके टाकून बंद करण्यात आले आहेत. तसेच रत्नागिरी शहरातील भाट्ये येथे जांभा चिरा रचून रस्ता बंद केला आहे. दापाेलीतील मुरुड, कर्दे, लाडघर येथील रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर आहे त्या गाेष्टींचा वापर करून बॅरिकेटिंग केले पाहिजे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पर्यटन विभाग यांच्यामार्फत ते व्हायला हवे. केवळ तात्पुरती व्यवस्था असून चालणार नाही तर व्यवस्थित पक्की बांधणी हाेणे गरजेचे आहे. रत्नागिरी पाेलिस, पाेलिस पाटील व ग्रामस्थ मिळून हे काम करत आहेत. आम्ही आहे त्या, पडलेल्या गाेष्टींचा वापर करून तात्पुरते बॅरिकेटिंग करून घेत आहाेत. तसेच गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करत आहाेत. - नितीन बगाटे, पाेलिस अधीक्षक, रत्नागिरी