चिपळूण : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठा भुयारी मार्गाने केबलच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मार्च २०२२ पूर्वी हे काम पूर्ण होईल, असे कोकण विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी बोलताना सांगितले.
औद्योगिक वसाहतीमधील भुयारी मार्गाने केबलच्या कामाची सुरुवात खेडचे कार्यकारी अभियंता विशाल शिवतरे, चिपळूणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन, उपाध्यक्ष रामकृष्ण कुलकर्णी सेक्रेटरी ॲड. राज आंब्रे, संचालक किसन चव्हाण, राजेंद्र पवार, रवी कुलकर्णी, संस्थापक अध्यक्ष सुनील शिर्के, लोटे गावचे सरपंच चंद्रकांत चाळके, घाणेखुंट गावचे सरपंच अंकुश काते, महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळाचे उपअभियंता नीलेश नानवटे, सहायक अभियंता विश्वास यादव उपस्थित होते.
लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशनने औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात वीजबिल न भरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. विद्युत वितरण कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर यांच्या सूचनेप्रमाणे उद्योजकांबरोबर अधिकाऱ्यांची सभा उद्योग भवन, लोटे येथे संपन्न झाली. या सभेत झालेल्या निर्णयानुसार बुधवारपासून या कामाला सुरुवात झाली. केवळ औद्योगिक वसाहतीसाठी आठ कर्मचारी देण्याचे मान्य केले आहे. त्या सभेत कोकण विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी याबाबतची माहिती दिली.
अनियमित वीजपुरवठाच्या प्रश्नाबाबत अध्यक्ष डॉ. पटवर्धन बोलताना म्हणाले की, औद्योगिक वसाहतीमधील कंडक्टर वारंवार तुटतात. त्यामुळे अखंड वीजपुरवठा उपलब्ध होत नाही. म्हणून संपूर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये भुयारी मार्गाने विद्युत वाहिन्याच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्यात यावा. औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र सेक्शन ऑफिस सुरू करावे. केवळ औद्योगिक वसाहतीसाठी कर्मचारी नियुक्त करावेत. ६३ आणि १०० केव्हीएच्या ४७ ट्रान्सफाॅर्मरची क्षमता दोनशे केव्हीए करावी. सहायक अभियंता कार्यालय लोटे येथे सुरू करण्याचे आदेश असतानाही हे कार्यालय खेड येथे सुरू आहे ते लोटे येथे सुरू करावे. टेस्टिंग युनिट मंजूर झाले आहे ते सुरू करावे, अशा विविध मागण्या केल्या.