असगोली : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये विविध पोस्टर्स, बॅनर्स असे विविध जाहिरातीचे फलक लावण्यास नगरपंचायतीचे परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये अनधिकृत पोस्टर्स भिंतीवर तसेच दुकानांवर चिकटवण्यात आले आहेत. मात्र, याकडे गुहागर नगरपंचायत डोळेझाक करत असून, संबंधितांवर कोणती कारवाई करणार असा सवाल उपस्थित होत आहे.गुहागर नगरपंचायत स्थापन होऊन सुमारे अडीच वर्षे पूर्ण होत आहेत. नगरपंचायतीच्या स्थापनेपासून विविध करांची आकारणी नगरपंचायतीकडून करण्यात येत आहे. त्यानुसार कोणतेही पोस्टर्स, बॅनर्स लावण्यासाठी गुहागर नगरपंचायतीमध्ये अधिकृतरित्या परवानगी घेणे बंधनकारक आहे. या परवानगीनंतर गुहागर नगरपंचायत त्याचे नाममात्र शुल्क आकारुन त्यासाठी ८ दिवसांची मुदत देते. या दिलेल्या मुदतीत हे पोस्टर्स अथवा बॅनर्स काढले गेल्यास हे शुल्क परत केले जाते, तर ते न काढल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते.दरम्यान, गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सध्या अशी अनधिकृत पोस्टरबाजी जोरदार चालू असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी हे पोस्टर्स चिकटवले आहेत तो भाग पूर्णपणे विद्रुप दिसत आहे. यासाठी नगरपंचायतने योग्य ती जागा नेमून देणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत लावण्यात आलेल्या या पोस्टर्सची अधिकृत परवानगी नगरपंचायतीकडून देण्यात आली होती का? असल्यास ती किती दिवसांची आहे? त्यासाठी ठिकाणे दिली होती का? इत्यादी प्रश्न उपस्थित होत आहेत. विविध पोस्टर्सबाजीमुळे गुहागर शहराला बकाल रुप आले आहे. यासाठी जर गुहागर नगरपंचायतीची अधिकृत परवानगी घेण्यात आली नसेल तर गुहागर नगरपंचायत यासाठी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. (वार्ताहर)
नगरपंचायत क्षेत्रात अनधिकृत पोस्टर्स
By admin | Updated: April 4, 2015 00:11 IST