देवरुख : चालकाचा ताबा सुटल्याने खासगी प्रवासी वाहतूक करणारी मिनीबस ६० फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात क्लीनरसहित दोघे ठार , तर २१ प्रवासी जखमी झाले. हा अपघात आज, शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यात मानसकोंड (पाच पीरजवळ) येथे घडला.प्रवासी उस्मान दाऊद खान (वय ५५, डिंगणी मोहल्ला) आणि गाडीचा क्लीनर मंगेश मारुती दळवी (४०, रा. चिपळूण) अशी मृतांची नावे आहेत. तर जखमींमध्ये दीपक हिराजी गमरे (५४, कुंभारखणी खुर्द), बिल्कीस मुक्त्यार जांभारकर (४५, आंबेड बु.), अकिला समीर जांभारकर (३०, आंबेड बु.), कांचन रामचंद्र सावंत (३१, देवरुख), शिवराज प्रकाश चव्हाण (२०, भोम, चिपळूण), संतोष विठ्ठल पवार (३८, कोंडअसुर्डे), नरेश शंकर नवले (३५, खेडशी, रत्नागिरी), अब्दुलकरीम इब्राहिम वागले (६०, डिंगणी), सुरेश दशरथ पराडके (५२, सावर्डा), संजय बारकू ओकटे (३५, तुरळ), राजेंद्र विठ्ठल हरेकर (३०, तुरळ), सागर संतोष मोरे (२०, कापरे, चिपळूण), सुलतान फकीर माल-गुंडकर (४०, आंबवली, देवरुख), महेश जगन्नाथ लिंगायत (३०, कुरधुंडा, गावमळा), सुदेश चंद्रकांत मयेकर (२३, गावखडी), चेतन अनंत कदम (२९, चिपळूण), सुप्रिया सुनील खापरे (३५, पेडांबे, चिपळूण), प्रमोद शांताराम सोलकर (२९, अणदेरी, कसबा), रेश्मा संतोष जाधव (३०, उक्षी), आशा नरेश नवले (३०, खेडशी, रत्नागिरी), नहीम हुसेन मापारी (४०, मुचरी) यांचा समावेश आहे. चिपळूण ते रत्नागिरी जाणारी ही मिनीबस (एमएच-०८-९३८९) २१ प्रवासी घेऊन रत्नागिरीकडे जात होती. बसचा चालक सुलतान मालगुंडकर तर क्लीनर मंगेश मारुती दळवी होता. मानसकोंड येथे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस ६० फूट दरीत कोसळली. क्लीनर दळवी गाडीखाली सापडल्याने; तर प्रवासी उस्मान दाऊद खान गाडीतून बाहेर फेकले गेल्याने या दोघांचा जागीच मृत्यू झाला. येथून जाणारी एस.टी. महामंडळाची प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांनी या अपघातग्रस्तांना मानसकोंड, आंबेड बुद्रुक व संगमेश्वरच्या ग्रामस्थाच्या मदतीने बाहेर काढले. मंगेश दळवीचा मृतदेह क्रेनच्या साहाय्याने बस बाजूला करून काढण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक मनोहर चिखले, देवरुखचे पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, पी. एस. आय. पाटील घटनास्थळी पोहोचले. अर्धा तास दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होती. (प्रतिनिधी)
चालकाचा ताबा सुटल्याने मिनीबस दरीत कोसळून दोन ठार
By admin | Updated: September 20, 2014 00:33 IST